वॉशिग्टन दि.३ – बॅकर तर्फे नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणात फायदा कमावण्यात आणि कर्जवाटपात जगात आशिया खंड आघाडीवर आहेच पण त्यातही बँक ऑफ अमेरिकेला मागे टाकून जगातील सर्वाधिक श्रीमंत बँक म्हणून चीनच्या इंडस्ट्रीअल अॅन्ड कमर्शिअल बँक- आयसीबीसी बँकेने आपला ठसा उमटवला आहे. केवळ नफ्यातच नव्हे तर कर्जवाटपातही या बँकेने आघाडी घेतली आहे.
जेपी मॉर्गन ने आपला दुसरा क्रमांक कायम राखला असून तिनेही बँक ऑफ अमेरिकाला मागे टाकले आहे. तर एचएसबीसी, बार्कले या ब्रिटीश बँकांनी नफ्यात घट नोंदविली आहे. करदात्यांच्या पाठिब्यामुळे वाचलेल्या आरबीएस व लॉईड या ब्रिटीश बँका अजूनही धोक्यात आहेत. विशेष म्हणजे या सर्वेक्षणानुसार फ्रेंच बँकांनीही ब्रिटीश बँकांना मागे टाकले आहे. ब्रिटीश बँकांनी नफ्यात ४१ टक्के घट नोंदविली आहे तर फ्रेंच बँकानी नफ्यात ३० टक्के घट नोंदविली आहे.
एचएसबीसी चवथ्या क्रमांकावर असून पहिल्या दहात असलेली ही एकमेव ब्रिटीश बँक आहे. मात्र तिचे हे यश आशियाई व्यवसायाचा हातभार लागल्यामुळेच आहे असेही दिसून आले आहे. स्टन चार्ट बँक रॅंकंग सुधारणारी एकमेव ब्रिटीश बँक असून तिचे रॅकींग ३४ वरून ३३ वर आले आहे. या बँकेने तीन टक्के वाढ नफ्यात नोंदविली आहे.