अहमदाबाद- गेल्या काही दिवसापासुन सतत मिळणा-या जीवे मारण्याच्या धमकीमुळे इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणाचा तपास करणारे सीबीआय अधीक्षक संदीप तानगाडगे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तानगाडगे यांच्याकडे मुंबई गुन्हे शाखा व अहमदाबाद येथील विशेष तपास पथकाचा अतिरिक्त कार्यभार आहे.
अहमदाबाद शहराबाहेर इशरत व अन्य तिघांची बनावट चकमकीद्वारे १५ जून २००४ रोजी हत्या केल्याचा आरोप आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाचा तपास तानगाडगे यांच्याकडे देण्यात आला. तपास अंतिम टप्प्यात असून ७ जुलै रोजी आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे. यादरम्यान तानगाडगे यांना अज्ञात व्यक्तींकडून वारंवार जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. सतत मिळणा-या धमक्यांची माहिती त्यांनी सीबीआय संचालक रणजित सिन्हा यांना दिली.
यानंतर सीबीआयचे संचालक सिन्हा यांनी राज्याच्या गृह विभागाला पत्र पाठवून तानगाडगे यांच्या सुरक्षेत वाढ करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तानगाडगे यांना सशस्त्र सुरक्षा रक्षकांची सुरक्षा पुरवण्यात आली असून निवासस्थान परिसरातही बंदोबस्त वाढविला आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त के. के. पाठक यांनी दिली. सुरक्षेबाबत पोलिस महासंचालक व पोलिस आयुक्तांशी चर्चा करण्यात आल्याचे तानगाडगे यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून येत असलेल्य धमक्यामुळे सुरक्षाव्यंवस्थेत वाढ करण्यात आली आहे.