स्नोडेनची भारताकडे आश्रयासाठी विनंती

मास्को दि.२ – अमेरिकेतील राष्ट्रीय संरक्षण संस्थेची गुप्त कागदपत्र फोडल्याप्रकरणी सध्या मास्कोतील विमानतळावर ट्रांझिट झोनमध्ये असलेल्या एडवर्ड स्नोडेन याच्यासाठी भारतासह वीस विविध देशांकडे आश्रय मागितला गेला असल्याचे विकिलिक्सवर जाहीर करण्यात आले आहे. विकिलिक्सच्या कायदेशीर सल्लागार सारा हेस्टीन यांनीच हे अर्ज स्नोडेनतर्फे या देशांकडे पाठविले असल्याचे समजते.

विकिलिक्सवर देण्यात आलेल्या माहितीनुसार स्नोडेनसाठी सर्वप्रथम इक्वेडोर आणि त्यानंतर आईलसँडकडे आश्रय मागितला गेला आहे. त्यानंतर रशियाकडेही आश्रय देण्याविषयीचा अर्ज केला गेला आहे. या शिवाय अन्य २० देशाकडेही आश्रयासाठी विनंती केली गेली असल्याचे व हे सारे अर्ज हेस्टीन यांनी स्वतःच दाखल केले असल्याचे समजते.

दरम्यान स्नोडेन याने त्याचा राजाश्रय मागण्याचा हक्क नाकारल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना दोष दिला असून त्यासंबंधी त्याने रशियात २३ जून रोजी केलेले स्टेटमेंट विकिलिक्सवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. स्नोडेन म्हणतो, ओबामा यांनी स्नोडेनला कुठल्याच देशाने आश्रय देऊ नये असे बजावले आहे तर उपाध्यक्ष ज्या देशांकडे आश्रयासाठी विनंती केली आहे, त्या देशांच्या नेत्यांवर दबाव आणत आहेत. जगाचा नेता म्हणविणार्‍या माणसाकडून अशा वर्तणुकीची अपेक्षा नाही.

Leave a Comment