सहजिवनाच्या पन्नाशीत पुन्हा विवाह

अभिनयाचे क्षेत्र आणि संसार यांचा उत्तम समतोल साधलेलं चित्रपटसृष्टीतील आदर्श जोडपं म्हणून ज्येष्ठ अभिनेता रमेश देव व अभिनेत्री सीमा देव यांना ओळखले जाते. या दोन्ही दिग्गज कलावंतांनी मराठी बरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने लक्षात राहावी अशी भरीव कामगिरी केली आहे. रुपेरी पडद्यासाठी गेली 50 हून अधिक वर्षे कार्यरत असणा-या रमेश देव आणि सीमा देव दाम्पत्यांचा उत्साह आजही तरुणांना लाजवेल असा आहे. त्याकाळी कोल्हापूरच्या (अयोध्या) आताच्या राजाराम थिएटरमध्ये झालेला हा शाही विवाह सोहळा सर्वांसाठी कौतुकाचा विषय ठरला.

पडद्यावरची आवडती जोडी प्रत्यक्ष जीवनात एकत्र आल्याचा प्रेक्षकांना आनंद झाला होता. त्यांच्या सहजीवनाला येत्या 1 जुलैला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. मुलं, सुना, नातवंड यांच्या गोतावळयात हे देव दाम्पत्य प्रसन्न सहजीवनाची अनुभूती घेत आहे. नायक, खलनायक, चरित्र अभिनेता, निर्माता-दिग्दर्शक अशा विविध माध्यमात यशस्वी ठरलेला, मराठी-हिंदी रुपेरी पडद्यावरील बहुढंगी रुबाबदार व्यक्तिमत्व असलेले रमेश देव..तितक्याच घरंदाज सौंदर्य व सोज्वळ अभिनयाने परिपूर्ण असलेल्या सीमा देव यांची ऑन स्क्रिन असणारी केमिस्ट्री पडद्यामागे प्रत्यक्ष जीवनातही तितकीच बहरुन आली. कलाकार म्हणून त्यांचा प्रवास, मराठी सिनेमा, हिंदी सिनेमा, नाटकं अशी वळणं घेत समृध्द झाला. आपल्या कारकिर्दीत अनेक दिग्गज कलाकार आणि दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलं. त्यांच्या अनेक भूमिकांचं कौतुक झालं. मात्र यशाची हवा कधी या दाम्पत्याच्या डोक्यात गेली नाही.

तमाशापटांच्या लाटेत सीमा देव यांनी जगाच्या पाठीवर, सुवासिनी, सोनियाची पाऊले, हा माझा मार्ग एकला, पाहू रे किती वाट या सारख्या चित्रपटांतून सोज्वळ भूमिकांची एक परंपराच निर्माण केली. या भूमिकांच्या टोकाला जाऊन त्यांनी अपराध आणि मोलकरीण या चित्रपटांमध्ये खलनायिकाही रंगवली. 1957 मध्ये आलेल्या आलिया भोगासी या सीमा देव यांच्या पहिल्या चित्रपटात रमेश देव यांनी त्यांच्या भावाची भूमिका साकारली होती. 1958 मध्ये आलेल्या ग्यानबा तुकाराम चित्रपटात ती दोघं प्रथम नायक-नायिका म्हणून एकत्र आले. याच काळात रमेश देव यांनी सीमा देव यांना प्रपोज केलं, पुढे त्या दोघांचं लग्न झालं.
2010 मध्ये गोष्ट लग्नानंतरची या चित्रपटातून सीमा देव निर्मात्याच्या भूमिकेत तर रमेश देव दिग्दर्शकांच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आलेत. वयाचा 80 चा टप्पा पार केल्यानंतरही कायम असणारा त्यांचा उत्साह आजच्या तरुणांना शिकण्यासारखा आहे. त्रषिकेश मुखर्जीच्या आनंद चित्रपटात दोघांनी महत्त्वपूर्ण भूमिका केली होती त्यात त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करण्याचे दृश्य होते. रिअल लाइफ मध्ये ही जोडी लग्नाचा 50 वा वाढदिवस पुन्हा विवाहाबंधनात अडकुन सजरा केला.

Leave a Comment