मुंबई सेंट्रल धाडीत आत्तापर्यंत मोजले गेले दोनशे कोटी

मुंबई, दि.2- नॅशनल इन्वेस्टिगेशन एजंसी (एनआयए) आणि आयकर विभागाच्या एका संयुक्त कारवाईत मारलेल्या छाप्यामध्ये 200 कोटींची रोकड तसेच दागिने सापडले आहेत. काल रात्री मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन बाहेर चार ट्रकांमध्ये 150 पोत्यांमध्ये ही रोकड आणि दागीने सापडले असून हे चारीही ट्रक सील करण्यात आले आहेत. या सर्व संपत्तीचा संबंध हवाला व्यापाराशी असल्याचा अधिकार्‍यांना संशय आहे. या प्रकरणात जवळपास 45 कुरीअर सर्व्हिसवाल्यांना अटक करण्यात आली आहे. या कुरीअर सर्व्हिस वाल्यांवर दागीने एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेण्याचा आरोप लावण्यात आला आहे. आयकर विभागाकडून या मालमत्तेसंदर्भात तपास सूरू असन हा पैसा कोणाचा आणि कोणाला पाठवण्यात येत होता याचा शोध घेण्यात येत आहे. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक तपासणीत हा काळा पैसा असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याच बरोबर हा पैसा दहशतवादासाठी वापरण्यात येणार होता का असाही संशय व्यक्त करण्यात येत आहे. ही सर्व पोती गुजरातला जाणार्‍या मालगाडीत भरण्याआधीच या सर्व पोतींना जप्त करण्यात आले आहे.

अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार ही सर्व संपत्ती कुरीअर सर्व्हिसतर्फे गुजरातमधील विविध शहरांमध्ये पाठवली जाणार होती. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, व्ही.पी. रोड पोलिस स्टेशनचे काही पोलिसकर्मी या संपत्तीच्या रक्षणासाठी काम करताना दिसले. यामध्ये पोलिस स्टेशनचे वरिष्ठ इन्स्पेक्टर राजेंद्र चव्हाण यांच्याकडून या प्रकरणाबाबत अधिक माहिती घेण्यात येत आहे. छापा मारल्यानंतर दोन्ही विभागांतर्फे ही सर्व संपत्ती सिंधीया हाऊसमध्ये आणण्यात आली. जेव्हा या सर्व पोत्यांना खोलण्यात आले तेव्हा अधिकार्‍यांचे डोळे चकाकले. या सर्व पोत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड आणि दागीने भरलेले होते. या जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेची किंमत जवळपास 200 कोटी रुपयांएवढी असल्याचे सांगितले जात आहे. एनआयएच्या एका अधिकार्‍यांनी सांगितले, की ही रक्कम कोटींमध्ये आहे. ही सर्व रक्कम 140 पोत्यांमध्ये भरण्यात आली असून ही सर्व पोती गुजरातसाठी रेल्वेत भरण्यात येणार होती. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर एनआयए तसेच आयकर विभागाच्या 40 अधिकार्‍यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली.’

एनआयएच्या एका अधिकार्‍याने सांगितले, की हवालामार्फत पैसे बाहेर पाठवण्याची ही नवीन घटना नाही, परंतु एवढ्या मोठ्या मात्रेत रोकड पकडले जाण्याची ही पहिलीच घटना आहे.’ अधिकार्‍यांकडून करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीत हा पैसा कोण्या एकट्याचा असेल असे वाटत नसून याबाबत कुरिअर सर्व्हिसवाल्यांची चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. अटक झालेले कुरिअर सर्व्हिसवाले स्वतःला निर्दोष सांगत आहे. हा पैसा कोणी कुरीअर केला आहे त्याबाबत माहिती देण्यास आम्ही तयार आहोत असे त्यांनी सांगितले. परंतु या कुरिअर केलेल्या पोत्यांमध्ये काय आहे हे आम्हाला माहित नव्हते. या अटक झालेल्या अमर शर्माने सांगितले, की आमचा व्यवसाय विश्वासावर चालतो. आम्ही वजनाच्या हिशोबाने पैसे घेतो. पाठवण्यात आलेल्या पार्सलमध्ये काय आहे याबाबत आम्ही ग्राहकाला विचारत नाही हीच आमच्या व्यवसायाची विशेष गोष्ट आहे.’

Leave a Comment