दंगलीतील आरोपींचा प्रचार करतेय राष्ट्रवादी!

सांगली, दि.2 – सांगली महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने दंगलीतील आरोपींचा आधार घेतल्याचे दिसत आहे. 2009 मध्ये सांगलीत दंगल भडकावणार्‍या आरोपींच्या प्रचारसभेस चक्क गृहमंत्र्यांनीच हजेरी लावत लांबलचक भाषणही केले तर दुसरीकडे मिरजेत दंगलीच्या आरोपीलाच सोबत घेवून कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी उमेदवारांच्या जाहीर सभा घेतल्या. त्यामुळे नैतिकतेच्या भाषा शिकवणार्‍या आणि स्वच्छ चारित्र म्हणून डांगोरा पिटणार्‍या गृहमंत्र्यांचे आणि राष्ट्रवादीचे खरे रूप दिसून येत आहे. असे चित्र पाहून राष्ट्रवादी कुठल्या दिशेने चालली आहे, असा प्रश्‍न सांगलीकरांनासह राज्यातील नागरिकांना पडला आहे. आगामी निवडणुकांत याचा काय परिणाम होणार याविषयीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

सांगली महापालिकेची निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. यासाठी राष्ट्रवादीने दररोज नवा नेता आणून सांगली-मिरजेत सभा घेतल्या आहेत. राष्ट्रवादीने दिलेले उमेदवार हे गुन्हेगारी स्वरूपाचे आणि गंभीर गुन्हे दाखल असलेले आहेत, असे सातत्याने आरोप केले जात आहेत. यामध्ये राष्ट्रवादीने दंगलीतील आरोपींनाही उमेदवारी देवून टाकल्याने निष्ठावंत आणि प्रामाणिक उमेदवारावर संक्रांत आणली आहे. विशेष म्हणजे 2009 साली मिरजेत उसळलेल्या जातीय दंगलीतील आरोपी मैन्नुद्दिन बागवान आणि सांगलीत ज्यांनी हीच दंगल पेटविली, असा अज्जू पटेल यांच्यासह तडीपार आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणार्‍यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे.

सर्वात धक्कादायक बाब अशी की सांगलीत दंगल भडकवणार्‍या राष्ट्रवादीचा उमेदवार अज्जू पटेल यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेला चक्क गृहमंत्री आर आर पाटील यांनी उपस्थिती लावली. दंगलीतील आरोपीच्या मांडीला मांडी लावून बसून आपण कित्ती स्वच्छ चारित्र्याचे आहोत हे समाजाला दाखवून दिले. तर दुसरीकडे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी मिरज दंगलीचा आरोपी मैनुद्दीन बागवान यांच्यासोबतच प्रचार सभांना हजेरी लावली.

Leave a Comment