तरूणाईची रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीला पसंती

नवी दिल्ली दि.२ – इंडस्ट्री बॉडी असोचेम ने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात सध्याचे हॉटेस्ट गुंतवणूक क्षेत्र हे रियल इस्टेटचे असल्याचे दिसून आले आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या तरूणांपैकी तब्बल ८५ टक्के नागरी तरूणांनी याच क्षेत्रात गुंतवणुक करण्यास प्राधान्य असल्याचे सांगितले आहे. जागेतील गुंतवणूक ही खात्रीची, चांगले रिटर्न देणारी असल्याचे या वर्गाचे मत आहे.

सर्वेक्षणात नोंदविण्यात आलेल्या मतांनुसार तरूण वर्ग विशेषतः शहरी तरूण वर्ग सोने, म्युच्युअल फंड किवा शेअर्सपासून जाणीवपूर्वक लांब राहात असल्याचे आढळले आहे. सोन्याचे दर कधी खाली येतील ते सांगता येत नसल्याने ही गुंतवणूक फायदेशीर म्हणता येणार नाही. जागतिक मंदी आणि रूपयाच्या दरात सतत होत असलेले चढउतार यामुळे शेअर्सचे क्षेत्रही या तरूणांना खात्रीचे वाटत नाही. कार्पोरेट क्षेत्रात नोकरी करणार्‍यांचे पगारही रूपयाच्या दरावर खालीवर होतात. अशा वेळी जागेतील गुंतवणूक खात्रीची वाटते.

अर्थात आजही १५ टक्के तरूण सोने, शेअर्स किवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असले तरी नोकरदार आणि प्रोफेशनल्स मात्र जागेतील गुंतवणूकीस प्राधान्य देत आहेत. या गटाची दुसर्‍या आणि तिसर्‍या टायरमधील शहरातील गुंतवणुकीस अधिक पसंती आहे. त्यात पुणे, जयपूर, हृषिकेश, हरद्वार, नैनिताल, चंडीगढ, डेहराडून, सोनपत, पानिपत, नाशिक या शहरांचा समावेश आहे. निवासी आणि व्यावसायिक अशा दोन्ही जागांसाठी ही गुंतवणूक होत आहे.

सर्वेक्षणानुसार ६२ टक्के तरूण मुंबई दिल्ली, कोलकाता, हैद्राबाद, बंगलोर या सारख्या टायर वन शहरांत गुंतवणूक करणे अधिक पसंत करतात तर डबल इन्कम असणारे मेट्रोसिटीत एक घर असेल तर सेकंड होमसाठी आपल्या गावाला प्राधान्य देतात असेही दिसून आले आहे.

Leave a Comment