देहूआळंदीच्या पालख्यांचे पंढरीच्या दिशेने प्रस्थान

पुणे,दि.30प्रतिनिंधी:यावर्षी वेळेवर पाउस आल्याने शेतकरी सखा सुखावला आहे, असे निरोप घेवून अलंकापुरीच्या माउलीच्या पालख्या कांही लाख वारकर्‍यांच्या सह पंढरीरायाच्या भेटीला रवाना झाल्या. आज पहाटेपासूनच वारकर्‍यांची लगभग सुरु होती. सायंकाळी साडेपाच वाजता श्रीमाउलींच्या चरणपादुका वारकर्‍यांच्या स्वाधीन करण्यात आल्या. दुपारी दोन वाजल्यापासून मानाच्या तीस दिंडया मंदिराच्या परिसरात दिंडीस आरंभ करण्यासाठी जमा झाल्या होत्या. तेंव्हापासूनच मंदिराचा परिसर भक्तिमय झाला होता. सायंकाळी चरणपादुका पालखीत ठेवण्यात आल्या व नंतर तीन तासपर्यंत पालखीची प्रदक्षणा दिंडी सुरु झाली. पहिल्या दिवशी माउलींच्या पालख्यांचा मुक्काम आजोळी म्हणजे गांधीवाड्यात असतो. त्यानुसार रात्री पालख्या आजोळी दाखल झाल्या.

आळंदीप्रमाणे श्रीक्षेत्र देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पहाटेच पुण्याच्या दिशेने रवाना झाल्या. दुपारी पालख्या शक्तीभक्तीचौकात पोहोचल्या तेंव्हा पालख्यांचे हजारो नागरिकांनी भक्तिमय वातावरणात स्वागत केले. पंधरा वर्षापूर्वी या भक्तिशक्ती चौकात संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीचे शिल्प उभारण्यात आले आहे. तेथे पालख्यांच्या स्वागतास सारी पिंपरी व सारे चिंचवड लोटले होते. आज संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचा मुक्काम आकुर्डीयेथे राहणार आहे.उद्या सकाळी त्या पुण्याला रवाना होतील.

आळंदीयेथे कालपासून आळंदी म्हणजे अलंकापुरी वारकर्‍यांनी गजबजली होती. यावर्षी पाउस समाधानकारक झाल्याने बळीराजा सुखावलेला जाणवत होता. आळंदी गावात पुण्याच्या दिशेने सारे रस्ते वारकर्‍यांच्या दिंडयांनी भरभरून चालले होते. आज पहाटे पावणेचार वाजता काकडाआरती झाली व सव्वापाच वाजता दर्शनबारी सुरु झाली. दुपारी पाउणपर्यंत दर्शनबारी सुरु होती. पण नंतर वारीच्या प्रस्थानाच्या दृष्टीने मंदिराची स्वच्छता करण्यात आली. दुपारी तीन वाजल्यापासून वैष्णवांचा मेळा मंदिरात जमू लागला. पालखीचे प्रस्थान होईपर्यंत युवा वारकर्‍यांनी मंदिर परिसरात मृदंगनृत्य, टाळनृत्य आणि वीणानृत्य यातील निरनिराळे क्रीडा प्रकार सादर केले. माउलींच्या पालख्याही सोमवारी पुण्यात दाखल होणार आहेत.

Leave a Comment