देहराडून: पंधरा दिवसांपूर्वी उत्तराखंडमध्ये आलेल्या जलप्रलयात अजूनही तीन हजार यात्रेकरु बेपत्ता असल्याचा दावा उत्तराखंड सरकारने केला आहे. राज्यात झालेल्या प्रलयात नेमके किती नागरिक मृत्युमुखी पडले हे कधीच समजणार नाही असे मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, अजून महाराष्ट्रातील १९७ यात्रेकरु बेपत्ताच असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री सुरेश धस यांनी दिली.
उत्तराखंडमध्ये तीन हजार नागरिक बेपत्ता
आगामी काळात एकत महिनाभरात जर बेपत्ता नागरिक सापडले नाहीत, तर त्यांच्या नातेवाईंकांना नुकसान भरपाई देण्यात येईल, असा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हेलिकॉप्टरच्या मदतीने अडकलेल्या लोकांपर्यंत सामना पोहोचवण्यात येत आहे. या कामात एनडीआरफसह लष्कर, हवाई दल, एलटीबीपीची मदत घेतली जात आहे.
दरम्यान, उत्तराखंडमधल्या महाप्रलयातून मराठी भाविकांना शोधण्यासाठी सलग ११ दिवस ठाण मांडलेले मदत व पुनर्वसन राज्यमंत्री सुरेश धस मुंबईत परतले आहेत. महाराष्ट्रातल्या २८ यात्रेकरुंना सोबत घेऊन काल रात्री उशिरा धस मुंबईत परतले. आतापर्यंत महाराष्ट्रातले ३३५० भाविक महाराष्ट्रात परतले असले तरीही अजून १९७ यात्रेकरु बेपत्ताच असल्याची माहिती सुरेश धस यांनी दिली. पण या बेपत्ता यात्रेकरुंचा शोध घेण्याचे प्रयत्न अजूनही सुरु आहेत.