2 जुलैपासून एसटीची भाडेवाढ

पुणे, दि. 29 (प्रतिनिधी) – डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होत असल्याने हकीम समितीच्या सूत्रानुसार एसटी महामंडळाला 6.69 ट्नके भाडेवाढ करण्यास राज्य परिवहन प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. ही भाडेवाढ आज मध्यरात्रीपासून (रविवार) लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे महागाईने त्रस्त झालेल्या प्रवाशांचा एसटी प्रवास आता मोठ्याप्रमाणात महागला आहे. या भाडेवाढीचा सर्वात पहिला झटका पंढरीच्या वारीला जाणार्‍या वाराकर्‍यांना बसणार आहे.

डिझेल खरेदीमध्ये एसटी महामंडळाला थेट ग्राहक म्हणून राज्यशासनाकडून मिळणारी सबसिडी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे डिझेलच्या किमती वाढल्या की महामंडळाला आपोआप भाडेवाढ, या सूत्रानुसार राज्य शासनाच्या राज्य परिवहन प्राधिकरणाकडून भाडेवाढ करून देण्यात येते. एसटी महामंडळाने राज्य परिवहन प्राधिकरणाकडे 12 ट्नके भाडेवाढीचा प्रस्ताव सादर केला होता; परंतु राज्य परिवहन प्राधिकरणाने 6.69 ट्नके भाडेवाढ करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे एसटीच्या पहिल्या टप्प्यात 1 रुपयाची वाढ होणार असून लांब पल्ल्याच्या प्रवाशांचा प्रवास सुमारे 15 ते 20 रुपयांनी महागणार आहे.

एसटी महामंडळानेगेल्या दोन वर्षांत तीनवेळा भाडेवाढ केली आहे. गेल्या वर्षी 5 ऑगस्ट रोजी 6.25 टक्के, तर 27 सप्टेंबर रोजी 5.88 टक्के एवढी भाडेवाढ करण्यात आली होती. सध्या डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होत असल्याकारणाने एसटी महामंडळाने 12 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविला होता. त्यानुसार प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये महामंडळाला भाडेवाढ करण्यास अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. या भाडेवाढीमुळे एसटीच्या प्रवाशांचा एसटी प्रवास मोठ़्याप्रमाणात महागणार आहे. याचा सर्वात मोठा झटका ग्रामीण भागातील प्रवाशांना बसणार आहे.

Leave a Comment