हुमा कुरैशीही दाखविणार साईज झिरो फिगर

बॉलिवूडमध्ये नट्यांच्या अभिनयापेक्षाही त्यांचे रूप व बांध्याला जास्त महत्त्व दिले जाते. जेमतेम अभिनयाच्या ठोकळा नट्यांनी केवळ आपल्या कमनीय बांध्यामुळे कारकीर्द टिकविल्याची अनेक उदाहरणे देता येतील. हल्लीच्या प्रचंड स्पर्धेच्या युगामध्ये नट्या आपल्या आरोग्याबाबत जरा जास्तच सजग झाल्या आहेत. सगळ्यांमध्ये एकमेकींपेक्षा सुंदर दिसण्याची चढाओढ लागली आहे.

आधी विद्या बालन, नंतर सोनाक्षी सिन्हा आणि आता हुमा कुरैशी चित्रपटांमध्ये स्वत:ला सडपातळ दाखविण्यासाठी जीव तोडून मेहनत घेताना दिसत आहे. दबंगगर्ल सोनाक्षीनंतर लोकांच्या नजरा आता हुमा कुरैशीकडे वळल्या आहेत. लोकांच्या अपेक्षा वाढल्यानेच हुमा आपल्या आगामी चित्रपटांमध्ये साईज झिरो फिगरमध्ये दिसण्यास इच्छुक आहे. त्यासाठी गेल्या दिवसांपासून ती आपल्या आरोग्याबाबत भलतीच चिंतित आहे. हुमाने गँग्ज ऑफ वासेपूर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर लव्ह शव दे चिकन खुराणा आणि एक थी डायन या चित्रपटांतील आपला शानदार अभिनय व अदाकारीने तिने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळविले आहे. मात्र हुमाला आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवणे अतिशय कठीण जाते. कारण हुमाच्या वडिलांचा हॉटेलचा व्यवसाय आहे. त्यामुळे बालपणापासूनच ती खाण्यापिण्याबाबत चांगलीच शौकिन आहे. मात्र सध्या ती जिभेला आळा घालून व्यायामात घाम गाळत आहे.

हुमा सांगते की, याआधी तिने तेवढे चित्रपट केले आहेत त्यामध्ये आपल्या लूकवर फारसे लक्ष दिले नव्हते, मात्र आता आपल्या हाती जे चित्रपट आहेत, त्यांच्यासाठी ती सडपातळ असणे तिच्या भूमिकेची मागणी आहे. म्हणूनच झिरो फिगर मिळविण्यासाठी ती भरपूर मेहनत घेत आहे. फक्त हुमाच नाही तर गोविंदा आणि परिणिती चोप्रानेही हल्लीच आपले वजन अनेक किलोंनी घटवून घेतले आहे.

Leave a Comment