दुबईत बनतेय पहिले क्रोकोडाईल पार्क

दुबई दि.२९- जगातले पहिले क्रोकोडाईल प्रिझर्व्हेशन पार्क दुबईत उभारले जाणार असून त्यासाठी २७,२२,५०० डॉलर्स म्हणजे १० लाख दिरहॅम इतका खर्च येणार आहे. दुबईच्या इशान्येला सुमारे २० हजार चौरस मीटर भागात हे पार्क उभे केले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळापासून १० किमी अंतरावर हा प्रकल्प आकारास येणार आहे.

याविषयी अधिक माहिती देताना अॅसेट मॅनेजमेंट डिपार्टमेंटचे संचालक खलिफा अब्दुल हरेब म्हणाले की या पार्कमुळे दुबईच्या पर्यटन क्षेत्राला अधिक चालना मिळण्यास मदत होईलच पण या विषयात संशोधन करू इच्छीणारे विद्याथी, संशोधक यांनाही अभ्यासासाठी त्याचा उपयोग होऊ शकेल. येथे विविध प्रकारच्या मगरी सुसरींचे जतन केले जाणार आहे. पर्यटकांनाही निसर्गासोबत साहसाची संधी त्यामुळे मिळणार असून वाईल्ड लाईफ टूरिझम वाढविण्यासाठीही मदत होणार आहे.

जगात मगर सुसरीच्या अनेक जाती आहेत. त्यापैकी कांही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. येथे जगातील सर्व जातींच्या मगरी सुसरी आणल्या जाणार आहेत. व्हाईट अॅक्सिस इनव्हेस्टमेंट या कंपनीबरोबर त्यासाठी दुबई महापालिका करार करत आहे. हा प्रकल्प बीओटी तत्त्वावर उभारला जात असून २४ महिन्यात तो पूर्ण केला जाणार आहे.

Leave a Comment