उत्तराखंडमध्ये हवामान बिघडल्याने बचावकार्यात अडथळे

केदारनाथ: शनिवारी उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा हवामान बिघडल्यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण झाले आहेत. या भागात आलेल्या पुरामुळे तसेच रस्ते खचल्याने मदतकार्य रखडले आहे. त्यामुळे तिथे अडकलेल्या सुमारे दोन हजार नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आणखी काळ लागण्याची चिन्हे् आहेत. दरम्यान, उत्तराखंडमध्ये झालेल्या महाप्रलयाला तोंड देण्यात कमी पडल्याची कबुली प्रथमच उत्तराखंड सरकारने दिली आहे. सरकारचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री यशपाल आर्य यांनी बोलताना हे स्पष्ट केले.

केदारनाथमध्ये शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. अशा परिस्थितही पोलिस आणि बचावपथकाचे जवान केदारनाथमधल्या मृतदेहांचा शोध घेत आहेत. महाप्रलयामध्ये रुद्रप्रयाग ते तिलवाडा यांना जोडणाऱा रस्ता पूर्णपणे उध्वस्त झाला होता. मात्र तात्पुरत्या वाहतुकीसाठी त्याच्या बांधणीचे काम सध्या सुरु आहे.

दुसरीकडे उत्तराखंडात महाप्रलयामुळे अडकलेल्या अनेक यात्रेकरुंसाठी पाठवलेल्या जीवनावश्यक वस्तूंवर चोरटे डल्ला टाकत आहेत. त्यामुळे या वस्तू असलेल्या ट्रकची पोलिस संरक्षणात वाहतूक होत असल्याचे समजते.