सीमा प्रश्नी चीनची सकारात्मक भूमिका

बिजींग, दि.28 – भारत आणि चीनमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या सीमा वादाच्या मुद्यावर सर्वसमावेशक तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांच्या विशेष प्रतिनिधींमध्ये चर्चा सुरु झाली आहे. चीनचे नवनियुक्त विशेष प्रतिनिधी यांग जिची यांनी, येत्या काळात दोन्ही देशांचे व्दिपक्षीय संबंध अधिक द्ढ होतील असा दोन्ही बाजूंचे समाधान करणारा सर्वमान्य तोडगा काढण्याचा प्रयत्न करु असे सांगितले.

सीमा प्रश्नावर दोन्ही देशांच्या विशेष प्रतिनीधींमध्ये सोळाव्या फेरीची चर्चा होत आहे. भारताच्यावतीने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन विशेष प्रतिनिधी म्हणून बैठकीसाठी चीनला गेले आहेत. यांग जिची चीनचे परराष्ट्रमंत्री होते. त्यांनी डाय बिंगग्यु यांच्याकडून विशेष प्रतिनिधीची जबाबदारी स्वीकारली आहे. दोन्ही देशांच्या विशेष प्रतिनिधींकडे अत्यंत महत्वाची जबाबदारी आहे असे यांग जिची यांनी सांगितले. चीनमध्ये नव्या नेतृत्वाने सत्तेची सूत्रे स्वीकारल्यानंतर दोन्ही देशांमध्ये सीमा प्रश्नावर ही पहिलीच बैठक होत आहे.

भारत आणि चीनमध्ये अरुणाचल आणि लडाखमधील सीमेवरुन वाद आहेत. भारताच्या ताब्यात असलेल्या अरुणाचलप्रदेशवर चीन आपला हक्क सांगत आहे. अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचे चीनचे म्हणणे आहे. काही महिन्यांपूर्वी चीनने भारताच्या ह्द्दीतील लडाखमध्ये घुसखोरी करुन आपला दावा सांगितला होता. यावेळी दोन्ही देशांनी आक्रमक भूमिका घेतली होती.

Leave a Comment