व्हाईट हाऊसमध्ये घुसखोरी करणार्‍या महिलेला अटक

वॉशिंग्टन, दि.28 – अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेले व्हाईट हाऊस राष्ट्रातील सर्वाधिक संवेदनशील व सुरक्षित ठिकाण मानले जाते. मात्र, एका आंदोलनकर्त्या महिलेने येथील सुरक्षा व्यवस्था तोडत चक्क व्हाईट हाऊसच्या संरक्षक भिंतीवरूनच उडी मारत आत प्रवेश केला. पोलिसांनी या महिलेला अटक केली असून, तिची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.

डियान विल्सन असे या अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून, तिच्यासोबत आणखी 16 जण व्हाईट हाऊसच्या इमारतीसमोर साखळी करीत आंदोलन करीत होते. आंदोलनादरम्यान घोषणा देत असतानाच पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना न जुमानता त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले. यादरम्यान पोलीस व आंदोलनकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाली. याच बाचाबाचीदरम्यान काही पोलिसांची नजर चुकवून डियानने धावत जाऊन व्हाईट हाऊसच्या संरक्षक भिंतीवरून आतमध्ये उडी टाकली. हे लक्षात येताच इतर पोलिसांनी तत्काळ आतमध्ये जात तिला अटक केली. तिच्यावर व्हाईट हाऊसमध्ये बेकायदा प्रवेश करण्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. क्युबातील ग्वुआन्टेनामो बे येथील कैद्यांचा कॅम्प बंद करण्यात यावा, यासाठी या महिला व्हाईट हाऊससमोर आंदोलन करीत होत्या. लवकरच हा तळ बंद करण्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी नंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. या कॅम्पमध्ये संशयित दहशतवाद्यांना कैदेत ठेवण्यात येते.