कंगणा बनणार हिंदीतील पहिली ‘सुपरवुमन’

– कुणीही गॉडफादर नसताना बॉलीवूडमध्ये स्वबळावर आपले स्थान निर्माण करणार्‍या अभिनेत्री कंगणा राणावतच्या वाट्याला आता मोठा बहुमान आला आहे. कंगणा हिंदी चित्रपटांतील पहिलीच सुपरवुमन बनणार आहे. राकेश रोशनच्या आगामी ‘कृष-३’ या चित्रपटात ती सुपरवुमनचे पात्र साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात ऋतिक रोशन मुख्य भूमिकेत असून त्याच्यासोबत प्रथमच ती रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.

भारतीय सुपरहिरो ‘कृष-३’मध्ये ऋतिक सुपरमॅनची भूमिका करणार आहे, तर कंगणा सुपरवुमनचे पात्र साकारताना दिसेल. या चित्रपटातील माझी भूमिका सुपरवुमनच्या धर्तीवरच बेतलेली असल्याने मी त्यास सुपरवुमनचेच पात्र म्हणेल, असे कंगणा सांगते. या चित्रपटात मोठय़ा प्रमाणावर अँक्शन असल्याने माझ्यासाठी तो अतिशय आव्हानात्मक होता, असेही तिने स्पष्ट केले. या चित्रपटातील आपली अँक्शन व साहसदृश्ये प्रभावी होण्यासाठी तिने बरीच मेहनत घेतली असून चीनमधील एका अँक्शन दिग्दर्शकाचीही मदत घेतली आहे. आपल्या या मेहनतीचे नक्कीच गोड फळ मिळेल व
सुपरवुमनची ही भूमिका सगळ्य़ांच्या पसंतीस उतरेल, अशी तिला अपेक्षा आहे.

या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही नक्की झाली असून दिवाळीच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे ४ जूनला तो पडद्यावर दाखल होईल. हल्लीच ‘कृष-३’च्या ट्रेलर लाँचिंगप्रसंगी दिग्दर्शक राकेश रोशनने ही माहिती दिली. दिवाळीच्या दुसर्‍या दिवशी सुट्टी असते, हे गणित लक्षात घेऊनच या दिवशी शुक्रवार नाही तर सोमवार असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. काळवेळ यांचे समीकरण लक्षात ठेवून चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी राकेश रोशन सुरुवातीपासून ओळखला जातो. या वेळीही त्याने ही संधी अचूक साधली आहे. या चित्रपटात ऋतिक रोशनची दुहेरी भूमिका असून एका भूमिकेत तो ६0-७0 वर्षांचा वृद्ध पिता तर दुसरीत २५ वर्षांत तरुण मुलगा असेल. या चित्रपटात कंगणासोबतच प्रियंका चोप्राही असणार आहे.

Leave a Comment