मोदींच्या बैठकिला गडकरींची दांडी

मुंबई : गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी गेल्या तीन दिवसांपासून मुंबई भेटीवर आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यांनतर त्यांनी शिवसेनेचे कार्यध्य्क्ष उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक घेतली. यावेळी राज्यातील सर्वच भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते. मात्र भाजपचे माजी अध्यक्ष नितिन गडकरींनी दांडी मारली. ही बैठक सोडून नॉर्वेच्या दूतावासातील भेटीला त्यांनी प्राधान्य दिल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे.

भाजपच्या प्रचारप्रमुखपदी नरेंद्र मोदींची निवड झाल्याने नितिन गडकरीही नाराज आहेत का? अशीही चर्चा आता दबक्या आवाजात सुरु झाली आहे. रंगशारदात झालेल्या बैठकीत गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह सगळे दिग्गज नेते झाडून उपस्थित होते. या बैठकीनंतर नरेंद्र मोदींनी थेट मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये १५ मिनिटं चर्चाही झाली.

नितिन गडकरींसाठी नॉर्वेच्या दुतावासातील बैठक महत्वाची की भाजपच्या कोअर कमिटीची?, हा प्रश्न पडला आहे. आगामी काळात होत असलेल्या निवडणूकीची रणनीती ठरवण्यासाठी, मोदींच्या नेतृत्वात झालेल्या पहिल्याच बैठकीला गडकरींनी दांडी मारली. मात्र त्यानंतर सुरु असलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात नितिन गडकरींनी हजेरी लावली. विशेष म्हणजे गेले तीन दिवस गडकरी मुंबईतच ठाण मांडून होते.