चीनची महिला बनली अंतराळातील पहिली शिक्षिका

बिजिंग, दि.28 -चीनची दुसरी महिला अंतराळवीर वँग येपिंग या देशाची पहिली अंतराळ शिक्षक बनली आहे. सध्या सुरू असलेल्या चीनच्या मानवी अंतराळ मोहिमेत सहभागी झालेल्या वँग येपिंगने अंतराळातील जीवनाच्या विविध पैलूंबाबत सुमारे 6 कोटी चिनी विद्यार्थ्यांसमोर अंतराळातून व्याख्यान दिले. अंतराळातून घेतलेल्या या शिकवणीमध्ये तिला तिच्यासोबत अंतराळयानात असलेल्या तिच्या सहका-यांनी प्रात्यक्षिके सादर करून मदत केली.

त्यांनी वजनरहित अवस्था कशी असते व न्यूटनच्या गतीविषयक नियमांवर त्यांचा कोणता परिणाम होतो, याची प्रात्यक्षिके सादर केली. अंतराळातून हे सर्व प्रक्षेपण थेट (लाइव्ह) करण्यात येत होते व या वेळी चीनमधील 330 प्राथमिक व माध्यमिक शाळांतील 6 कोटींहून अधिक विद्यार्थी व 80000 शिक्षक ते पाहत होते. त्याचबरोबर इतर अनेक चिनी नागरिकांनीही या प्रक्षेपणाचा आनंद घेतला. ही शिकवणी घेत असताना येपिंग हवेत जवळजवळ तरंगतच होती.

सर्वाना अभिवादन करून मी वँग येपिंग, आज तुमचे लेक्चर घेणार आहेफ, असे तिने कॅमे-याकडे हसून पाहत सांगितले. त्या वेळी तिने धातूच्या पट्टीला दोराच्या साहाय्याने लटकवलेला एक चेंडू कसा हलतो त्याचे प्रात्यक्षिक दाखवले. ज्या प्रकारे पृथ्वीवर हा चेंडू दोलकाप्रमाणे(पेन्डयुलम) हलला असता तसे न होता तो वर्तुळाकार गतीने फिरत असल्याचे तिने दाखवले. त्यानंतर तिने पाण्यामध्ये धातूचे कडे बुडवून त्याच्या वर्तुळाकार पोकळीमध्ये अडकलेला पाण्याचा पातळ थर(फिल्म) कसा मोठा होत जातो, त्याचे स्पष्टीकरण दिले. अवकाशात शून्य गुरुत्वाकर्षणामुळे पृष्ठीय ताण(सर्फेस टेन्शन) नसल्यामुळे ही क्रिया घडून येते, असे तिने सांगितले. गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली काम करू शकणारी मोजमापे करणारी सामान्य उपकरणे अवकाशात असताना वापरता येत नाहीत हे तिने दाखवून दिले. न्यूटनच्या दुस-या नियमावर आधारित तयार केलेली मोजणी करणारी विशेष उपकरणे कशी काम करतात, त्यांची माहिती दिली.

ख्रिस्ता मॅकाफी ही अमेरिकेतील एका माध्यमिक शाळेतील शिक्षिका जगातील पहिली अंतराळ शिक्षिका होती. मात्र, 28 जानेवारी 1986 रोजी ती आणि तिचे इतर सहा सहकारी स्पेस शटल चॅलेंजरच्या प्रक्षेपणानंतर केवळ 73 सेकंदानंतर
झालेल्या अपघातात मरण पावले. मॅकाफी या महिलेची बदलीफ म्हणून सज्ज ठेवण्यात आलेल्या बार्बरा मॉर्गन या महिलेने मॅकाफी यांचे अपूर्ण कार्य 2007मध्ये अंतराळातून शिकवणी घेऊन पूर्ण केले.

Leave a Comment