
मुंबई, दि.27 – गुजरातचे मुख्यमंत्री तसेच निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष नरेंद्र मोदी हे मुंबई दौर्यावर असून त्यांनी आज (गुरुवार) शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना’मधील संपादकीयमध्ये काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांच्यावर टिका करण्यात आली होती. मोदींनी उत्तराखंड पूरामध्ये अडकलेल्या जवळपास 15 हजार गुजराती लोकांना संकटातून बाहेर काढल्याच्या बातम्या माध्यमांनी प्रसारित केल्या होत्या. याच बाबत शिवसेनेने आपल्या संपादकीयमध्ये उत्तराखंडसारख्या घटनांमध्ये प्रांतवादाला काहीच महत्व नाही असे लिहून मोदी समर्थकांना चांगलाच टोला लगावला होता. नरेंद्र मोदी यांनी मुंबई दौर्यात पक्षाच्या कोर कमिटीसमवते आगामी लोकसभा निवडणूकीच्या रणनितीबाबत चर्चा केली. मोदी यांनी सकाळी 11.30 वाजता वांद्रे (पश्चिम) येथील रंगशारदा हॉलमध्ये भाजपच्या प्रदेश कोर कमिटीच्या सदस्यांसोबत बैठक घेतली. यामध्ये बैठकीत आगामी निवडणुकीच्या रणनितीबाबत तसेच शिवसेना अध्यक्ष उध्दव ठाकरेंनी नुकतेच केलेल्या वक्तव्याबाबत चर्चा करण्यात आली. याशिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमवेत राजकीय संबंधाबाबतही कोर कमिटीच्या सदस्यांनी मोदी यांना
आपले विचार सांगितले. यानंतर मोदी ताजमहल हॉटेलमध्ये भारतीय उद्योग महासंघाने (सीआयआय) आयोजित केलेल्या उद्योगपतींच्या सभेमध्येही सहभागी होणार आहेत. यानंतर
संध्याकाळी 5.30 वाजता ते मुंबई शेअर बाजारातील पक्षाचे वरिष्ठ नेता विनय सहस्रबुध्दे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करणार आहेत. उत्तराखंडामधील फक्त गुजराती लोकांना वाचवण्याचा आरोप असल्यामुळे मोदींनी आपल्या कार्यकर्त्यांना मुंबई विमानतळावर त्यांचे स्वागत न करण्याचे
सांगितले होते.