कॉंग्रेस व तेलगू देसमच्या नेत्यात हाणामारी

डेहराडून: उत्तराखंडमधील जलप्रकोपात अडकलेल्या यात्रेकरूंच्या सुटकेसाठी हवाई दल, लष्कर व निमलष्करी दले प्रयत्नांची शर्थ करीत आहेत. दुसरीकडे आंध्र प्रदेशातील यात्रेकरूंच्या बचावकार्यावरून सत्ताधारी कॉंग्रेस व तेलगू देसम या पक्षांच्या नेत्यांमध्ये श्रेय घेण्यायवरून वाद उफाळून आला. डेहराडून येथील जॉली ग्रॅंट विमानतळाबाहेर काग्रेस व तेलगू देसमच्या खासदारांची जोरदार धक्काबुक्की झाली.

आंध्र प्रदेशातील यात्रेकरूंची उत्तराखंडमधील नैसर्गिक आपत्तीमधून सुटका झाल्यानंतर त्यांना हवाई मार्गाने राज्यात परत नेण्यावरून वाद उफाळून आला. कॉंग्रेसचे खासदार हनुमंतराव व तेलगू देसमचे खासदार रमेश राठोड व के. नारायण यांची चक्क मारामारी झाली. तेलगू देसमचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रकाराला दोन्ही पक्षांच्या समर्थकांनी केलेल्या परस्परविरोधी घोषणाबाजीने उत्तेजन मिळाले.

आंध्र प्रदेशातील यात्रेकरूंना नेण्यासाठी कॉंग्रेस व तेलगू देसम या दोन्ही पक्षांनी विमानाची व्यवस्था केली होती. त्यामुळे या यात्रेकरूंना कोणी न्यायचे यावरून मारामारी झाली. आंध्र प्रदेश राज्य सरकारने हैद्राबाद येथे नेण्यासाठी दिलेल्या विमानात या यात्रेकरूंना चढण्यास तेलगू देसमच्या नेत्यांनी रोखल्याचा आरोप हनुमंतराव यांनी केला. आम्हीही विमानाची व्यवस्था केली आहे, असा पवित्रा तेलगू देसमच्या नेत्यांनी घेतला, असे राव यांनी या घटनेनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. किरणकुमार रेड्डी यांनी यात्रेकरूंना परत आणण्याची जबाबदारी राज्याचे नागरी पुरवठा राज्यमंत्री डी. सुंदरबाबू यांच्यावर सोपवली असून तेदेखील डेहराडून येथे तळ ठोकून आहेत. आपल्या शासकीय कामात तेलगू देसमच्या नेत्यांनी अडथळा आणल्याचा आरोप त्यांनी केला. तेलगू देसमचे लोकसभेचे खासदार रमेश राठोड यांनी मात्र राव व सुंदरबाबू यांच्या आरोपांचे खंडन केले.

Leave a Comment