उत्तराखंडाप्रमाणे जगभरच्या अशा प्रलयांचे वर्णन आहे दासबोधातही

मान्सूनच्या पावसाने अतिवृष्टी होवून उत्तराखंड राज्यात जी हानी झाली आहे तशा हानीचा यापूर्वीचा इतिहास नाही. ही ढगफुटी आहे की, मानवकृत विध्वंस आहे यावर कदाचित दोन मते असू शकतील पण असे उत्पात पूर्वीही मोठ्या प्रमाणावर झाले असावेत, असा संदर्भ रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या दासबोधात आलेला आहे. भारतात असा प्रलयंकारी पाउस जसा उत्तराखंडमध्ये झाला आहे तसाच मोठा पाउस युरोपमध्ये झाला आहे. तेथे गेल्या पाचशे वर्षातील रेकार्डच्या तुलनेत यावर्षीचा पूर सर्वात मोठा असल्याची टिपणी तेथील प्रसारमाध्यमांनी केली आहे. केवळ भारतातील नव्हे तर सार्‍या पृथ्वीतलावर असा प्रलयी महापूर आल्यावर कशी स्थिती होते याचे वर्णन दासबोधात आहे. त्या ग‘ंथाच्या तेराव्या दशकातील चौथ्या समासातील काही ओव्यांचा उल्लेख खाली देत आहोत.

‘ पृथ्वीस होईल अंत। भूतास मांडेल कल्पांत । ऐसा समाचार साध्यंत । शास्त्री निरोपिला॥ शत वरुषे अनावृष्टी। तेणे जळेल हे सृष्टी। पर्वत माती ऐसी पृष्ठी। भूमीसी तरके ॥ सिंधूरवर्ण वसुंधरा। ज्लाला लागती फणिवरा। आहाळोन सरारा। विष वमी॥ त्या विषाच्या ज्वाळा निघती। तेणे पाताळे जळती। माहा पावके भस्म होती ।पाताळ लोक॥ येथे महाभूते खवळती। प्रळये वात सुटती। प्रळये पावक वाढती । चहुंकडे॥ वायो विजांचे तडाखे। तेणे पृथ्वी अवघी तरखे। कठिणत्व अवघेचि फाके। चहुकडे॥ पृथ्वीने विरी सांडिली। अवघी धगधायेमान झाली। ब‘ह्मांड भटी जळोन गेली ।येकसरा॥ जळोन विरी सांडिली। विशेष महावृष्टी झाली। तेणे पृथ्वी विरली जळामध्ये॥

भाजला चुना जळी विरे। तैसा पृथ्वीस धीर न धरे। विरी सांडोनिया त्वरे। जळी मिळाली॥ तेथे प्रलय मेघ उचलले। कठिण घोषे गर्जिन्नले। अखंड विजा कडकडिले । ध्वनि घोष॥ प्रर्वतप्राये पडती गारा। पर्वत उडती ऐसा वारा। निबिड तया अंधकारा। उपमाचि नाही॥
सिंधु नद्या एकवटल्या। नेणो नभीहून रिचवल्या। संधिच नाही धारा मिळाल्या। अखंड पाणी॥ तेथे मच्छ कूर्म सर्पपडती । पर्वता सारिखे दिसती। गर्जना होता मिसळती। जळांत जळे॥ सप्तसिंधु आवरणीगेले। आवर्णवेडे मोकळे झाले। जलरूप जालिया खवळले। प्रळये पावक॥ ब‘ह्मांडा ऐसा तप्त लोहो। शोषी जळाचा समुहो। तैसे जळास झाले पाहो। अपूर्व मोठे॥ तेणे अटोन गेले पाणी। असंभाव्य माजला वन्ही। तया वन्हीस केली झडपणी। प्रलयवाते॥ दीपास पालव घातला। तैसा प्रळये पावक विझाला। पुढे वायो प्रबळला। असंभाव्य॥ उदंड पोकळी थोडा वारा। तेणे वितळोण गेला सारा। पंचभूतांचा पसारा। आटोपला॥ महद्भूत महामाया। विस्मरणे वितुळ काया। पदार्थमात्रे राहावया। ठाव नाही॥ दृश्य हलकालोळे नेले। जड चंचल वितुळले। याउपरी शाश्वत उरले। परब्रह्म॥

भारतात उत्तराखंडात प्रलयसदृश पाऊस झाल्याने दासबोधातील वर्णन हुबेहु जुळते, ही वस्तुस्थिती आहे पण जी स्थिती भारतातील उत्तरेकडच्या राज्याची आहे तशीच स्थिती नेपाळमधील काही राज्यांची आहे. चीनमध्ये तर तीन प्रांतात आणिबाणी पुकारावी लागली आहे. भारतात उत्तरेत पूर आला की सर्वसाधारणपणे पाकिस्तानात पूर येतोच कारण उत्तर भारत व पाकिस्तान यांचे हवामान बर्‍यांच अंशी सारखे आहे पण यावेळी तेथे अशी महापूर आल्याची स्थिती नाही. काही ठिकाणी अतिवृष्टी आहे. पण पाकला जोडून असलेल्या अफगाणिस्थानमध्ये निम्मा देश या जादा पावसाने त्रस्त झाला आहे. युरोपमध्ये जादा पावसाचे प्रकार फारसे घडत नाहीत पण यावेळी तेथे सर्वच छोट्या छोट्या देशात पूर आले आहेत. जर्मनीमध्ये स्ट्रॉबर्गयेथील डनुबे नदीने गेल्या पाचशे वर्षाचा पुराचा उच्चांक मोडला आहे. तेथे उत्तरांचलाप्रमाणेच पूल व रस्ते कोसळले आहेत. जर्मनीमध्ये तीन आठवडे पर्यंत सेना दलाचे अकरा हजार सैनिक आणि अग्निशामक दलाचे सत्तर हजार फायरफायटर्स या पुराचा सामना करत होते. हंगेरी, स्लोवाकिया व ऑस्ट्रियामध्ये हीच स्थिती होती. जगाच्या अन्य प्रांतात अगदी याचवेळी नव्हे पण कांही काळापूर्वी झालेले प्रलय महापूर याहीपेक्षा गंभीर आहेत. आफि‘केत मोझांबिकमध्ये नुकतेच असे प्रलयी पूर येवून गेले आहेत. ऑस्ट्रेलियामधील बंडाबर्गमध्येही नुकत्याच झालेल्या पुराची स्थिती अन्य ठिकाणच्या स्थितीसारखीच आहे. गेल्या सीझनमध्ये नायजेरियातील नायजर आणि बेनू नदीचे पाणी काठावर दहा किमी परिसरात पसरले होते. चीनमध्ये यावर्षी दहा बारा ठिकाणी महापूर आहे पण प्रलयाची स्थिती फारशी नाही. चार वर्षापूर्वी बैचॉन प्रांतात अडीच लाख लोकांना हलविण्यात आले होते 70 लोक बळी गेले होते. समर्थ रामदास स्वामींनी साडतीनशे वर्षापूर्वी अशा प्रलयांचे इत्यंभूत वर्णन केले होते येवढेच नव्हे तर त्यांना त्याना ते त्यापूर्वीच्या अनेक ग्रन्थात सापडले

महाराष्ट्रात यावर्षी उत्तराखंडासारखी प्रलयासारखी स्थिती नाही पण ज्या राज्यात सिंचनासाठी सर्वात जादा खर्च करूनही जेथे कित्येक हजार लोक आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात, हे तर प्रलयाचेच लक्षण आहे. एकदा माणसाने सारासार विवेक घाण ठेवला की, निसर्गही त्या पद्धतीने त्याला प्रतिसाद देतो, असाच त्याचा आशय वाटत आहे. आठ वर्षापूर्वीचा मुंबईचा प्रलय व गेल्या आठवड्यातील उत्तरखंडातील महाप्रलय ही सारी त्या प्रलयाचीच वर्णने आहेत. गेल्या दहा वर्षात तरी कोणत्याही मोसमी पावसाच्या काळात पाउस नीट पडलेला नाही आणि पावसाचा काळ संपल्यावर पावसाचे उग‘ स्वरुप दिसले नाही असे एकही वर्ष गेले नाही. भाजलेला चुना चुना जसा पाण्यात विरतो त्याप्रमाणे जमीनच्या जमीन विरोन जाते. ती कधी अतिवृष्टीने तर कधी अनावृष्टीने. यातून कसा मार्ग काढायचा हाच खरे म्हणजे दासबोधाचा विषय आहे.जेवढा माणूस संयमित राहील तेवढो निसर्गही सहकार्य करणारा राहील आणि त्याचा मार्ग म्हणजे ‘यत्न तो देव जाणावा’ अर्थातच हा त्याचा गाभा आहे. जगातील विद्यमान परिस्थितीचे वर्णन करणारा ग्र‘थ साडेतीनशे वर्षापूर्वी लिहिला गेला आहे.

खरे म्हणजे प्रत्यक्ष वर्णनापेक्षा महाराष्ट्राची स्थिती गंभीर आहे. गेली पन्नास वर्षे साखरेच्या निर्मितीच्या नावाखाली एका बाजूला सारी जमीन खारावली गेली आहे तर दुसर्‍या बाजूला साखरेपेक्षा मद्याचे उत्पादन घेणे आवडू लागले आहे. वास्तविक साखरेपासून इंधन तयार होणारा मार्ग असतानाही त्याकडे लक्ष जाणून बुजून लक्ष न देणारे राज्यकर्ते येथे आहेत. याचा गाभा येवढाच की, उत्तराखंडाचा जसा प्रगट प्रलय आपण पाहातो आहोत त्याच प्रमाणे न दिसणारा प्रलयही तेवढाच मोठा आहे. या सार्‍यावर समथार्ंचा मार्ग परब‘ह्माचा आहे. पण परब‘ह्म ही जशी अध्यात्मिक संकल्पना आहे त्याच प्रमाणे आपल्या बाजूबाजूला संयमित विश्व हेच त्या परब‘ह्माचे स्वरुप आहे. माणूस जसा ही परिस्थिती निर्माण करतो त्याच प्रमाणे तो सुधारूही शकतो. यातील हवामान तज्ञांचे म्हणणे असे की, गेली आठ दहा वर्षे सतत हवामानात अनियमितता येत आहे. प्रत्येक जिल्ह्यात एखादे ठिकाणी तरी ढगफुटी होते अशी प्रलयाची स्थिती होते. समर्थांच्या वचनाचा अर्थ निघतो की मानवी हव्यासापोटी यापूर्वीही निसर्गावर अत्याचार करणारेही होवून गेले आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणून सार्‍या जगाला असे प्रलय व नरसंहार सहन करावे लागत आहेत. त्यातून मार्ग काढण्यासाठी संयमित जीवनाची आवश्यकता आहे, याचीच जाणीव या निमित्ताने समर्थांनी करून दिली आहे असे मानायला हवे.
.——————————-.
सोबत याच आठवडयातील ,जर्मनीतील प्रलयाचे दृष्य