नागपूर, दि.27 – राज्याचे रोजगार हमी मंत्री नितीन राऊत यांचे चिरंजीव कुणाल राऊत यांना मध्यप्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. सरकारी कर्मचार्यांच्या कामाकाजात अडथळे आणणे आणि त्यांना मारहाण करण्यासाठी कुणाल राऊत यांना अटक करण्यात आली आहे. कुणाल राऊत हे युवक काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारीही आहेत.
नितीन राऊत यांच्या मुलाला मध्यप्रदेशात अटक
मध्य प्रदेशातील मटकुली टोलनाक्यावरील कर्मचार्यांशी हुज्जत घालून त्यांना मारहाण केल्याप्रकरणी कुणाल राऊत आणि त्यांच्या चार मित्रांवर ही कारवाई करण्यात आली आहे. मध्यप्रदेशातील पंचमढी येथे पिकनिकसाठी गेलेल्यानंतर त्यांनी मटकुली टोलनाक्यावरील कर्मचार्यांशी हुज्जत घालून त्यांना मारहाण केली आणि ते पंचमढीला निघून गेले. सुरवातीला टोलवरील कर्मचार्यांनी अज्ञात प्रवाशांविरूद्ध गुन्हा दाखल केला, त्यानंतर पंचमढीवरून पिकनिक संपवून परतत असताना कुणाल राऊत यांच्या फॉर्चुनर गाडीची ओळख पटली आणि कुणाल राऊतसह मारहाण करणार्या त्यांच्या मित्रांना मध्यप्रदेश पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी अटक केल्यावरही कुणाल राऊत यांनी आपण मंत्र्यांचे चिरंजीव आहोत, असे सांगत पोलिसांवर दबाब आणण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याच्या दबाबाला न जुमानता त्याला अटक करून त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.
कुणाल राऊत यांच्यावर पोलिसांनी लावलेल्या वेगवेगळ्या कलमांमध्ये एक 332 हे अजामीनपात्र गुन्ह्यासाठी असल्याने त्यांना तुरूंगात राहावे लागत आहे. कोर्टापुढे हजर केल्याशिवाय त्यांना जामीन मिळणार नाही. आम्ही या संदर्भात रोजगार हमी मंत्री नितीन राऊत यांच्याशी संपर्क करण्याचा
प्रयत्न केला तर त्यांचा फोन कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असल्याचा संदेश देत होता.