भाज्यांचे एवढे कडाडले आहेत की त्या भावाने घेतलेल्य उसळीने सामान्य माणसाला भाज्या खाणे ही चैन वाटायला लागली आहे. काही ठिकाणी तर भाज्या एवढ्या महाग आहेत की भाज्यापेक्षा सोने स्वस्त वाटायला लागले आहे. दर वर्षी भाज्यांच्या भावात मोठी चढउतार होते. त्यातल्या त्यात पावसाळ्याच्या तोंडावर भाज्या महाग होतातच. हा काही नवा प्रकार नाही. दरवर्षीच या काळात भाज्या महाग असतात. मात्र अलीकडच्या काळामध्ये महागाईची एक नवी प्रक्रिया लोकांच्या अनुभवाला येत आहे. ज्या वस्तूंच्या दरात हंगामी वाढ होते तिच्यात पुन्हा हंगामी घट होतच नाही. एकदा वाढलेले दर कायम होऊन जातात. भाज्यांचा प्रकार अलीकडे तसाच झाला आहे. गेल्या टंचाईच्या हंगामात भाज्या ४० रुपये प्रतिकिलो झाल्या. पण टंचाईचा हंगाम संपला तरी त्या पुन्हा चाळीसच्या खाली आल्याच नाहीत. त्या कायमच महाग होऊन बसल्या आणि आता तर कहर झाला आहे आणि त्यामुळे या वर्षीची तेजी फार जीवघेणी ठरली आहे. काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांमध्ये लोक भाज्या घेण्याच्या ऐवजी भाज्यांना पर्याय म्हणून निरनिराळ्या उसळी खायला लागले असल्याचे म्हटले आहे. एका परीने ही गोष्ट बरीच झाली.
आयुर्वेदामध्ये भरपूर उसळी खाव्यात असे म्हटलेले आहे. कारण उसळींमधून ड जीवनसत्त्व मिळत असते. परंतु आपण उसळी खात नाही. आता मात्र आपद्धर्म म्हणून का होईना उसळी खाव्या लागत आहेत. म्हणजे भाज्यांचे दर वाढले ही एक इष्टापत्तीच ठरलेली आहे. पण उसळी पौष्टिक असतात याचा अर्थ उसळीच खाव्यात आणि भाज्या खावू नयेत असा नाही. उसळी खाल्ल्यातरी भाज्या आवश्यकच असतात. परंतु यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भाज्या कमी पिकल्या आहेत आणि त्यातच तेजीचा काळ आहे. त्यामुळे यावेळी भाज्यांच्या दरांनी अभूतपूर्व उसळी घेतली आहे आणि त्यामुळे मध्यमवर्गीय लोकांच्या जेवणात उसळीचा तोरा वाढला आहे. महाराष्ट्रातल्या काही महाग शहरांमध्ये काही भाज्या शंभर रुपये किलो दराने विकल्या जात आहेत. सर्वसाधारणतः अन्य शहरांमध्ये त्या साठ ते शंभर रुपयांच्या दरम्यान आहेत. नाशिकमध्ये गेल्या आठवड्यात कधी नव्हे ते कोथिंबिरीने मोठी मजल मारली आणि कोथिंबिरीची एक जुडी दोनशे रुपयांना विकली गेली. आल्याचा भाव तर विचारू नका. ते २० हजार रुपये प्रति क्विंटल एवढे महाग झाले आहे. म्हणूनच भेळच्या गाड्यावरची कोथिंबीर आणि कॅन्टीनच्या चहामधले गायब झाले आहे.
दोन वर्षापूर्वी कांद्याने फार भाव खाल्ला होता. त्यावेळी कांदा शंभर रुपये किलो असल्याचे सांगितले गेले होते. परंतु प्रत्यक्षात तालुक्याच्या ठिकाणी आणि ग्रामीण भागात ३५ ते ३० रुपये किलो दराने कांदा विकला जात होता. मुंबईच्या काही भागांमध्ये तो ८० रुपये किलो होता आणि मलबार हिलच्या भागात एका दुकानात उत्तम दर्जाचा कांदा १०० रुपये किलो दराने विकला गेला होता. माध्यमांनी मात्र कांदा १०० रुपये किलो असे मथळे टाकून मोठी खळबळ उडवून दिली होती. तसा प्रकार आताही सुरू आहे आणि मुंबईच्या श्रीमंत वस्त्यांमध्ये भाज्या २०० रुपये प्रतिकिलो दराने विकल्या जात आहेत. म्हणून काही माध्यमातून भाज्यांचे भाव २०० रुपये किलो असे प्रसिध्द केले जात आहे. प्रत्यक्षात सगळीकडे भाजी तेवढी महाग नाही. काही दुर्मिळ ठिकाणी दुर्मिळ भाज्या या दरात विकल्या जातात. विशेषतः ज्यांना परदेशी भाज्या म्हटले जाते त्या भाज्या तर नेहमीच एवढ्या महाग असतात. त्यांचे ग्राहकसुध्दा श्रीमंत असतात आणि त्यांना हा दर परवडतो. सर्वसाधारणपणे समाजात समृध्दी आली की जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढतातच आणि गेल्या पाच सहा वर्षात ही गोष्ट जाणवत आहे. मांस, भाज्या, फळे आणि दूध यांचे दर चांगलेच वाढलेले आहेत.
असे दर वाढण्याने शहरातल्या लोकांची मात्र तक्रार सुरू होते. कारण लोकांची क्रयशक्ती वाढली असली तरी काही लोकांना एवढ्या महागातल्या भाज्या आवाक्याच्या बाहेर गेल्याचे वाटते. भाज्यांचे भाव वाढले म्हणून सरकारवर टीका सुरू होते. परंतु सरकार भाज्यांच्या खरेदी विक्रीत लक्ष घालू शकत नाही. पण तामिळनाडू आणि केरळ या दोन राज्यांच्या सरकारांनी लोकांना गहू आणि तांदळासोबतच भाज्यासुध्दा स्वस्तात द्यायला सुरूवात केली आहे. पण भाजी खाणार्या लोकांना घरातसुध्दा भाजी पिकवता येते हे माहीत नाही अगदी सदनिकेतसुध्दा खोक्यात बाग लावता येते. ज्यांच्याकडे जागा उपलब्ध असेल त्यांना तर अशी परसबाग तयार करणे अगदीच शक्य आहे. घराच्या आसपास एखादा भोपळ्याचा वेल लावणे, सांडपाण्याच्या खाचरात अळू लावणे या गोष्टी फार अशक्य नाहीत. या उपरही ज्यांना भाजीपाल्यांची अशी लागवड करणे अवघड वाटते. त्यांना आता एक नवा पर्याय काढावा लागणार आहे. भाज्या नेहमीच महाग नसतात. काही वेळा त्या स्वस्तही असतात आणि कित्येक भाज्या स्वस्त असताना विकत घेऊन वाळवून घरात साठवता येतात. ही गोष्ट बर्याच लोकांना माहीत नसेल परंतु वांगी, मेथी, पालक, कोबी, गवार, भोपळा अशा भाज्यांच्या फोडी वाळवून ठेवता येतात. ती गोष्ट फार अवघड नाही.