पुणे, दि. 26 (प्रतिनिधी) – या देशातील तरुण पिढी बिघडवण्यासाठी पाकिस्तान व अफगाणिस्तान येथून मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ भारतात आणले जात आहेत व येथे पसरविले जात आहेत, त्यामुळे तरुणांची व्यसनाधीनता ही त्या तरुणांच्या दृष्टीने जशी धोक्याची आहे त्याप्रमाणे ती देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही गंभीर बनली आहे, असे पुण्याचे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी बोलून दाखविले.
‘समाजात पंधरा ते सोळा वयातील मुलांचे आणि मुलींचे व्यसनाधीन होण्याचे प्रमाण वाढत आहे, ही गंभीर बाब आहे, असे मुक्तांगण संस्थेच्या डॉ मुक्ता पुणतांबेकर यांनी यावेळी सांगितले. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त पुणे पोलिसांच्या वतीने आयोजित जनजागरण मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी ही भाषणे झाली. यावेळी सहपोलीस आयुक्त संजीवकुमार सिंघल, आयएमएच्या अध्यक्षा डॉ. माया तुळपुळे, मुक्तांगण संस्थेच्या मुक्ता पुणतांबेकर, पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे उपस्थित होते.
पोळ पुढे म्हणाले की,यासाठी जनतेची आपल्याला मदत घ्यावी लागणार आहे. अंमली पदार्थांचा कुठे वापर किंवा वाहतुक होत असेल तर त्वरीत पोलिसांना कळवावे. झोपडपट्ट्यांमध्ये ड्रग्सचे प्रमाण वाढत असून, व्यसनामुळे गुन्हेगारीचे प्रमाणही वाढत असल्याचे निदर्शन आले आहे. तर शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्हायटनरचे प्रमाण वाढत आहे. डॅा. तुळपुळे म्हणाल्या, व्यसनाबाबत समाजाची मानसिकत बदलायला पाहिजे. तंबाखु आपल्याच देशात जास्त पिकते आणि आपल्याच देशात जास्त खपते. त्यामुळेच कॅन्सर प्रथम स्थानावर आहे. सरकार ज्या दिवशी दारूबंदी करेल तो दिवस खर्या अर्थाने चांगला दिवस असेल.
——————————–