उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; २० जण मृत्युमुखी

गौचर- उत्तराखंडमध्ये अडकलेल्या हजारो यात्रेकरूंची सुटका करताना मदतकार्यात गुंतलेले हवाईदलाचे ‘एमआय-१७ व्ही-५’ हे हेलिकॉप्टर गौरीकुंड येथे कोसळले. या दुर्घटनेत २० जण मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामध्ये हवाईदलाचे अधिकारी, ‘आयटीबीपी’चे जवान आणि तीन नागरिकांचा समावेश आहे. रात्री उशिरापर्यंत आठजणांचे मृतदेह हाती लागले होते.

उत्तराखंडमध्ये मदतकार्यात गेल्या आठ दिवसांत लष्कर, हवाईदल आणि ‘आयटीबीपी’च्या बहादूर जवानांमुळेच ७० हजारांवर यात्रेकरूंचे प्राण वाचले आहेत. सोमवारपासून केदारनाथ परिसरात पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. ढगाळ हवामान, धुके आणि पाऊस यामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. तरीही जवानांनी गौचर ते गुप्तकाशी आणि केदारनाथ येथे मदतकार्य सुरू ठेवले. मंगळवारी दुपारी १२.३० वाजता केदारनाथ येथून तीन यात्रेकरूंना घेऊन हवाईदलाचे हेलिकॉप्टर निघाले आणि अवघ्या पाच मिनिटांनी गौरीकुंडच्या उत्तर बाजूस कोसळले. रात्री नऊपर्यंत आठजणांचे मृतदेह सापडले आहेत. हेलिकॉप्टरमध्ये २० जण होते.

मृतांमध्ये हवाईदलाचा एक विंग कमांडर, दोन फ्लाईट लेफ्टनंट, एक ज्युनिअर वॉरट ऑफिसर आणि एका सर्जंटचा समावेश आहे. इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस आणि ‘एनडीआरएफ’चे जवानही या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले आहेत. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळले आहे. सकाळी या हेलिकॉप्टरने केदारनाथ परिसरात दोन वेळा उड्डाण करून यात्रेकरूंना सुरक्षितस्थळी हलविले होते. मात्र, तिसर्याउ उड्डाणानंतर ही भयंकर घटना घडली.