अनुष्काची स्वप्नपूर्ती

अभिनेत्री अनुष्का शर्मासाठी २0१३ हे वर्ष संस्मरणीय ठरू पाहत आहे. यंदा तिला अनेक चित्रपटांच्या प्रस्तावासोबतच नवे घरसुद्धा मिळाले आहे. बॉलीवूडमधील अनेक बड्या दिग्दर्शकांच्या चित्रपटांमध्ये काम करत असलेल्या अनुष्काने हल्लीच आपल्या स्वप्नातील नव्या घरात प्रवेश केला आहे. आपल्या कुटुंबीयासोबत या घरात राहण्यास आलेली अनुष्का त्यासाठी मागील दीड वर्षांपासून मेहनत घेत होती.

२0१३ ने अनुष्काला बरेच काही दिले आहे. या वर्षी विशाल भारद्वाज, राजू हिरानी आणि अनुराग कश्यपसारख्या दिग्दर्शकांसोबत ती ‘पीके’ आणि ‘बॉम्बे वेल्वेट’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करीत आहे. याशिवाय आपल्या नव्या घरातही तिने प्रवेश केला आहे. मुंबईतील वर्सोवा या उच्चभ्रूंच्या वसाहतीत एका गगनचुंबी इमारतीत सर्वात वरच्या मजल्यावर तिने फ्लॅट विकत घेतला आहे. या इमारतीच्या जवळपास सगळ्य़ा भागांतून समुद्राचा सुंदर नजारा नजरेस पडतो. या घराचा एक हिस्सा स्वत:साठी राखून ठेवणारी अनुष्का तिथे आपले मातापिता आणि भावासोबत राहण्यास आली आहे. आपल्या कुटुंबासोबत राहावे अशी अनुष्काची पहिलेपासून इच्छा होती. या नव्या घरामुळे तिची ही इच्छा फलद्रूप झाली आहे.

या घरातील एका खोलीत अनुष्काने आपल्या बालपणीच्या आठवणी जतन केल्या असून तिथे मित्रमंडळीसोबत गप्पांचं फड रंगविण्यासोबतच आपला वाचनाचा छंद जोपासण्याची तिची इच्छा आहे. अर्थात हल्लीच नव्या घरात शिफ्ट झालेल्या अनुष्काला आपल्या भरगच्च कार्यक्रमांमुळे तिथे फार वेळ राहण्यास मिळत नाही. ‘पीके’च्या चित्रीकरणासाठी बेल्जियममध्ये असलेली अनुष्का तिथून परतल्यानंतर लगेचच ‘बॉम्बे वेल्वेट’च्या चित्रणासाठी श्रीलंकेला रवाना झाली आहे.

Leave a Comment