भारतावर हल्ल्यासाठी पाच टेरर ग्रुप तय्यार – गुप्तवार्ता विभाग

नवी दिल्ली दि.२६- काश्मीरमध्ये नुकताच लष्करी जवानांवर करण्यात आलेला दहशतवादी हल्ला हा पूर्वनियोजित कटाचाच भाग असून भारतावर हल्ले करण्यासाठी पाच दहशतवादी संघटना तयारीत असल्याचा इशारा इंडियन इंटेलिजन्स ब्युरो आणि अमेरिकन इंटेलिजन्स एजन्सीजनी दिला आहे.

या संस्थांकडून देण्यात आलेल्या इशार्याहनुसार पाकिस्तानात किमान १५ दहशतवादी संघटना सक्रीय असून त्यातील पाच केवळ भारतावर हल्ले करण्यासाठी तयारीत आहेत. या संघटनांत २० हजार दहशतवाद्यांचा समावेश आहे आणि जगात कुठेही दहशतवादी कारवाया करण्याची त्यांची क्षमता आहे. भारतावर हल्ले करण्याच्या तयारीत असलेल्या पाच संघटनात ११ हजार दहशतवादी सामील असून त्यातील २५०० सध्या पाकिस्तानात आहेत तर बाकीचे भारतातच लपून राहिलेले आहेत.

अमेरिकन एजन्सीच्या म्हणण्याप्रमाणे पाक सरकारने हफिजच्या जमात उल दवाला दिलेली सहा कोटींपेक्षाची अधिक मदत ही अशा हल्लयांसाठीच खर्च केली जात आहे.

भारतात हल्ले करण्यासाठी सिद्ध ्रअसलेल्या संघटनात इंडियन मुजाहिद्दीन ही प्रथम क्रमांकावर असून तिचे ५ हजार सदस्य देशभर पसरलेले आहेत. सौदी सारख्या बाहेरच्या देशातही या संघटनेचे दहशतवादी आहेत. लष्करे तैय्यबा ही दुसरी संघटना सर्वाधिक धोकादायक आहे आणि जगात कुठेही हल्ले करण्याची तिची क्षमता आहे. भारतात त्यांनी प्रामुख्याने काश्मीरवर लक्ष केंद्रीत केले होते मात्र १९९३ पासून मुंबईसारख्या मोठ्या शहरांवरही या संघटनेचे लक्ष आहे.

हरकत उल जिहाद- अल इस्लामी हिचे अस्तित्व प्रथम १९८० सालात अफगाणिस्तान येथे जाणवले होते. आता मात्र त्यांनी दक्षिण भारतावर लक्ष केंद्रीत केले असून त्यातही केरळ व हैद्राबाद येथे या संघटनेचे तळ आहेत. इलियास काश्मीरीसारखा पॉवरफुल नेता त्यांच्याकडे आहे आणि तोच सर्व हल्ले नियंत्रण करत असतो. हरकत उल मुजाहिद्दीन ही काश्मीरमध्येच असून त्यांचे ५०० सदस्य काश्मीरमध्ये सक्रीय आहेत. भारतीय लष्करापुढे अडचणी निर्माण करणे हेच त्यांचे मुख्य कार्य आहे.

जैशे मोहम्मद ही सर्वात धोकादायक संघटना आहे. तिच्या म्होरक्या मौलाना मसूर असद काश्मीरमधील हल्ल्यांनंतर थोडा बाजूला झाला असला तरी ही संघटना अजूनही सक्रीय आहे. त्यांचे ८०० सदस्य पुन्हा काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करण्याच्या कामी लागले असल्याचेही गुप्तचर संस्थांचे म्हणणे आहे. या सर्व संघटनांना पाकिस्तानी आयएसआय ची मदत मिळत असल्याचेही सांगितले गेले आहे.

Leave a Comment