बंगलोर दि.२६- संपूर्ण भारतभर प्रवास करून सर्वाधिक पल्ल्याचा प्रवास केल्याचे रेकॉर्ड टाटांच्या नॅनोने नोंदविले आहे. यामुळे नॅनो आता गिनीज वर्ल्ड रेकार्डमध्ये दाखल झाली आहे. मार्च २१ ते ३० या दहा दिवसांत नॅनोने संपूर्ण भारताची फेरी पूर्ण करून १०,२१८ किलोमीटरचा प्रवास केला आहे. भारताचे दक्षिण टोक समजल्या जाणार्या् कन्याकुमारीपासून हा प्रवास सुरू झाला आणि संपूर्ण भारतभर फिरून बंगलोर येथे तो संपला असे टाटा नॅनोचे अध्यक्ष रणजित यादव यांनी सांगितले.
यादव म्हणाले की बंगलोर येथील हौशी चालक श्रीकरूणा सुब्रह्मण्यम आणि त्यांच्या पथकाने हे रेकॉर्ड केले आहे. पूर्वीचे रेकॉर्ड ८०४६ किलोमीटरचे होते. गिनीज बुकमध्ये नांव नोंदवून नॅनोने उत्कृष्ठ तंत्रज्ञान, उत्कृष्ट इंजिन, विश्वासार्हता आणि टिकावूपणा याचेच प्रात्यक्षिक दाखविले आहेच पण भारताला जगाच्या मोटरिंग मॅपवर नेण्यातही आपला वाटा उचलला आहे.
भारताचा पहिला फॉर्म्युला वन मोटर रेस चालक नरेन कार्तिकेयन यांच्या हस्ते सुब्रह्मण्यम यांचा सत्कार करण्यात आला. तसेच या वेळी कार्तिकेयन याच्या हस्ते ६३ वर्षीय हौशी चालक थॉमस चाको यांच्या – अ टॉप द वर्ल्ड- या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. चाको यांनी २०१२ मध्ये देशात सतत ७८ दिवस नॅनो चालविली आहे. त्या अनुभवावरचे हे पुस्तक आहे.