सिहांवर संक्रांत- हाडांची तस्करी जोरात

अहमदाबाद दि.२५- अंतरराष्ट्रीय बाजारात वाघांच्या हाडांना असलेली प्रचंड मागणी पुरी करण्यासाठी वाघांऐवजी सिहांना मारून त्यांची हाडे विकण्याचा मोठा व्यवसाय उदयास आला असून त्यामुळे जगभरातील सिंहावर आता संक्रांत येण्याचा धोका निर्माण झाला आहे. मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्क मधील एम्पावर फौंडेशन या स्वयंसेवी संस्थेतर्फे ही माहिती देण्यात आली आहे.

गीर येथील जंगलात २००७ सालात आठ सिंह पोचरनी मारले होते. त्यावर पोलिस तपास होऊन संबंधित शिकार्‍यांची धरपकडही करण्यात आली होती. मात्र यापुढेही भारतातील सिहांना मोठा धोका असल्याचे वरील संस्थेचे म्हणणे आहे. सिहाची हाडे चीन, लाओस व व्हिएतनाम येथे मोठ्या प्रमाणावर विकली जात असून त्यांचा उपयोग चीनी पारंपारिक औषधांसाठी केला जातो असे समजते. हा व्यापार अवैध आहे मात्र तरीही चांगली किमत मिळते म्हणून वाघांऐवजी सिहांची शिकार केली जात आहे. वास्तविक चीनी औषधात वाघांची हाडे वापरली जातात मात्र वाघांची संख्या नगण्य असल्याने त्याऐवजी सिंहाची हाडे पुरविली जात आहेत. ही हाडे किलोला ३०० ते ५०० डॉलर्स अशा किमतीत विकली जातात.

चीनमध्ये ही हाडे तांदळाच्या वाईनमध्ये बुडवून दीर्घकाळ ठेवली जातात तर लाओस व्हिएतनाम येथे या हाडांची पूड करून पेस्ट करून ती तांदळाच्या वाईनमध्ये विरघळविली जाते. यापासून अनेक प्रकारची औषधे बनविली जातात आणि विविध रोगांसाठी ती वापरली जातात असे समजते.

Leave a Comment