लोकनाट्य कलावंत विकास परिषदेत रंगला ‘तमाशा’

पुणे, दि. 25 (प्रतिनिधी)- तमाशा कलावंतांना फड मालक वेठबिगारसारखे राबवत असल्याचा आरोप आज तमाशा विकास परिषदेत झाला. गावगुंडांची मनमानी, लहान फडमालकांची होणारी फसवणूक, कर्जाची समस्या, कलावंतांचे किमान वेतन या विषयांवर चर्चा न होता वैयक्तीक हेवेदाव्यांनीच परिषदेचा फड गाजला. मंगळवारी लोकनाट्य तमाशा फडमालक कलावंत विकास परिषदेचा ‘तमाशा’च झाला. तमाशा मालक कलावंत विकास संघाचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राज्यभरतील तमाशा कलावंत व फडमालक सहभागी झाले होते.

या वेळी राज्यस्तरीय विषयांच्या चर्चेची जागा तमाशा फडातील अंतरंग हेवे दाव्यांनी घेतली. राज्यात सर्वत्र स्थापन होणारे लहान तमाशा संघ. यामुळे लोक कलावंतांचे प्रश्‍न मागे पडत आहे. यासाठी सर्व तमाशा संघानी एकत्र यावे. त्याच्यात समन्वय असावा. तेव्हाच शासनस्तरावर दाद मिळवता येईल, असा एकच सूर यावेळी निघाला. अध्यक्ष खेडेकर यांचे तमाशा सं़घाकडे होणारे दुर्लक्ष, हा यावेळी प्रत्येकाच्याच भाषणाचा विषय होता.

यावेळी खेडेकर म्हणाले की, अध्यक्ष हा धावपळ करणारा असवा अशी पहिल्यापासूनच आपली भूमिका होती. प्रतिस्पर्धी असल्याने अध्यक्षपदावर काम करताना लोकांच्या मनात माझ्याबाबतीत गैरसमज आणि द्वेश निर्माण झाले आहेत. कलावंतांनी लहान-लहान संघटना स्थापन केल्यास मोठ्या संघटनेचे महत्व राहणार नाही. असे हेवेदावे असतील तर मला अध्यक्षपद नको. सरकारी यंत्रणेशी सामना करायचा असल्यास वैयक्तीक हेवेदावे बाजुला सारून एकजूट झाले पाहिजे.
तमाशाची स्पर्धा सध्या वाहिन्यांशी आहे असे खेडेकर यांनी सांगीतले. या परिषदेत काही ठराव संमत करण्यात आले. या मागण्या मान्य न झाल्यात पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर येथे गणेश विसर्जनाच्या दुसर्‍या दिवशी धरणे आंडोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

परिषदेत संमत झालेले ठराव
– दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने कायम फड मालकाला 8 ऐवजी 11 लाख तर हंगामी फड मालकाला 4 ऐवजी 7 लाख रुपयांचे पॅकेज जाहिर करावेत.
– शासकीय समितीवर लोककलावंताची निवड अनिवार्य असावी
– लोककलावंताच्या आर्थिक विकासासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे. त्यासाठी 1 हजार कोटीची तरदूत असावी
– तमाशा प्रशिक्षण शिबीर संघाला विचारात घेऊनच आयोजीत करावे
– सेवानिनृत्ती वेतनात वाढ होऊन ती प्रतिमहा सहा हजार करावी
– तमाशा गाडीला डिझेल व टोलच्या रकमेत सूट मिळावी
– भूमीहीन लोककलावंतांना 5 एकर जमीन देऊन शेतकर्‍याचा दर्जा द्यावा
– खानदेश, मुंबई, कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र आदी चार ठिकाणी सांस्कृतिक कार्य संचलनालय सुरू करावे
– शासकीय योजनांच्या प्रचारासाठी तमाशाला निधी मिळावा
– वाहिन्यांवर आठवड्यातून किमान तीन वेळा तमाशा कार्यक‘म दाखवावे.
.————————–.

Leave a Comment