टाटा स्टील आपला हिस्सा टाटा सन्सला विकणार

मुंबई दि.२५ – स्टीलच्या घसरलेल्या किमती आणि कर्जाचे झालेले ओझे यातून मार्ग काढण्यासाठी तसेच नवीन प्रकल्पात गुंतवणूक करण्यासाठी टाटा स्टील त्यांच्या टाटा मोटर्ससह अन्य कंपन्यातील शेअर पॅरेंट कंपनी टाटा सन्सला विकणार असल्याचे वृत्त आहे. या विक्रीतून टाटा स्टील ७२०० कोटी रूपये उभे करू शकणार आहे असे बँकर्सतर्फे सांगण्यात आले आहे.

टाटा स्टीलला ओडिशामधील प्रकल्प विकासासाठी दोन टप्प्यात ४२ हजार कोटी रूपये गुंतवायचे आहेत. पहिल्या टप्प्यासाठी १९ हजार कोटी गुंतवायचे होते मात्र रूपयाचे अवमूल्यन आणि महागाई यामुळे ही रक्कम आता २४ हजार कोटींवर गेली आहे. तसेच जादा दराने घेतलेले कर्ज परत करण्यासाठीही कंपनी प्रयत्नशील आहे. टाटा मोटर्समध्ये टाटा स्टीलचा ५.६ टक्के शेअर असून त्याच्या विक्रीतून कंपनीला ५०१४ कोटी रूपये मिळणार आहेत.

गेले कांही दिवस टाटा स्टील आणि टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये घरसण होत असून जानेवारीपासून स्टीलचा शेअर ३८ टक्के घसरला आहे. सोमवारी हे दोन्ही शेअर्स अनुक्रमे २७७ रूपये व २८४ रूपयांवर आले होते असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment