जपानी संशोधकांनी शरीरातील टिश्यू किवा स्नायू केवळ तीन दिवसांत पारदर्शक करणारे साखर आणि पाण्यापासून बनविलेलेले नवीन द्रावण तयार केल्याचा दावा केला आहे. यामुळे मेंदूच्या आतील भाग किवा अन्य अवयवांच्या आतील रचना समजणे कमी खर्चात, कमी वेळेत आणि कोणतीही इजा न करता, सोप्या आणि सुरक्षित पद्धतीने शक्य होणार आहे. विशेष म्हणजे या मुळे ज्या अवयवात हे द्रावण सोडले जाईल त्याचा आकार बदलणे किंवा रासायनिक बदल होणे टळणार आहे.
जपानमधील रिकेन सेंटर फॉर डेव्हलपमेंट बायॉलॉजी या संस्थेतील संशोधक डॉ.तकेशी इमाई आणि त्यांचे सहकारी डॉ. मेंग त्सेन के आणि सतोशी फुजीमोरो यांनी हे द्रावण बनविले असून ते फ्रूक्टोज साखरेपासून बनविले गेले आहे. उंदरावर याचे प्रयेाग केले तेव्हा उंदराच्या मेंदूतील आतील भाग तसेच उंदराच्या गर्भाच्या सहज आणि स्वच्छ प्रतिमा मिळू शकल्याचे त्यांनी सांगितले. तकेशी म्हणाले की अशाप्रकारचे द्रावण यापूर्वीही बनविले गेले होते मात्र त्याला कांही मर्यादा होत्या. कांही वेळा त्यामुळे सॅपंलमध्ये बदल घडून येणे असा धोका निर्माण होत होता आणि ती प्रक्रिया वेळखाऊ होती.
नवीन द्रावण शरीरात टोचल्यानंतर तीन दिवसांत ज्या अवयवाच्या अंतर्भाग पाहायचा आहे, त्याच्या बाहेरच्या टिश्यू पारदर्शक बनतात व आतील भागाच्या स्वच्छ प्रतिमा घेता येतात. या प्रयोगातून प्रथमच मेंदूचे दोन्ही भाग कसे जोडलेले आहेत हे पाहता आले आहे तसेच्या त्याच्या त्रिमिती प्रतिमाही घेता आल्या आहेत. यासाठी कोणत्याही विशेष उपकरणाची गरज भासत नाही. भविष्यात यामुळे मानवी अवयवांच्या तपासण्या अधिक सुलभतेने आणि जलद करता येणे शक्य होणार आहे असेही तकेशी यांचे म्हणणे आहे.