नवी दिल्ली दि. २५- ढगफुटी, भूस्खलन आणि पुराच्या तडाख्यात सापडलेल्या उत्तराखंड राज्याला भेट देण्यासाठी गेलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी चमोली जिल्ह्यातील गोचर येथे खराब हवामानामुळे अडकून पडले असल्याचे वृत्त आहे. सोमवारीच राहुल उत्तराखंड येथे गेले आहेत.
उत्तराखंडातील पुराच्या थैमानात लाखो भाविक अडकून मोठी प्राणहानी झाल्याच्या घटनेला एक आठवडा उलटून गेल्यानंतरही राहुल गांधी यांच्याकडून त्या संबंधी कोणतीही प्रतिक्रिया दिली गेलेली नव्हती तसेच ते कुठे दिसलेही नव्हते. या घटनेचे भांडवल करून भाजपने राहुल गांधी याच्यावर टीकेची झोड उठविली होती. अखेर कालच राहुल गांधी उत्तराखंडच्या दौरयावर रवाना झाले मात्र तेथील हवामानामुळे पुढे जाणे त्यांना अशक्य बनले आहे.
दरम्यान आज सकाळी सहाच्या सुमारास टिहरी देवप्रयाग येथे पुन्हा ढगफुटी झाल्याने किमान तीन जणांचा मृत्यू झाला असल्याचे तसेच या भागातील अनेक घरे पडल्याचे वृत्त आहे. उत्तराखंडात पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने बचत कार्यात अडथळे येत असून अडकलेल्या लोकांची सुटका करण्याचे काम मंदावले असल्याचे लष्कराकडून सांगितले गेले आहे.