संग्रहालयातील पुतळा फिरतोय आपोआप

लंडन दि.२४ – एखाद्या सुरक्षा रक्षकाला जागेवरच उभे राहून फक्त आजूबाजूला नजर ठेवायला सांगितले तर काय होईल? तो १८० अंश कोनातून आपली मान वळवून आजूबाजूला पाहील. हो ना? पण लंडनच्या मँचेस्टर संग्रहालयात अनोखीच घटना घडते असून त्यामुळे संग्रहालयाचा क्युरेटर कॅम्पबेल प्राईस गोंधळात पडला आहे. काचेच्या पेटीत असलेला ४ हजार वर्षांपूर्वीचा १० इंच उंचीचा नेब सेनू असे नामकरण केलेला भरीव पुतळा गेले काही दिवस आपोआपच १८० डिग्रीतून स्वतःभोवती फिरतो आहे.

या विषयी मिळालेल्या माहितीनुसार हा पुतळा इजिप्तमधील एका ममीमधून संशोधकांनी काढला होता. गेली ८० वर्षे तो या संग्रहालयात आहे. हा पुतळा १८०० बीसी काळातील असल्याचे सांगितले जाते. काचेच्या कपाटात हा पुतळा असून कपाटाला कुलूप आहे आणि किल्ली आहे संग्रहालयाच्या कयुरेटरकडे. गेले कांही दिवस हा पुतळा आपोआपच दिशा बदलतोय असे प्राईसला दिसले. प्रथम त्याला वाटले की धक्का लागल्याने पुतळा फिरला असेल. पुन्हा पूर्वस्थितीत ठेवूनही दुसरे दिवशी पुतळा आपला फिरलेलाच.

या गुढामुळे हैराण झालेल्या प्राईसने अखेर व्हिडीओ कॅमेरा लावून पुतळ्याला कुणी फिरवत तर नाही ना याची परिक्षा केली. तेव्हा व्हिडीओतही पुतळा जवळपास कुणीही नसतानाही आपोआपच फिरतोय असे दिसले. रात्रीत पुतळा स्थिर असतो, दिवसा हलतो. इजिप्तमध्ये पुरातन काळापासून असा समज आहे की कांही कारणाने ममी नष्ट झाली तर त्या आत्म्याला जे हवे ते देण्यासाठी असे पुतळे पर्यायी मार्ग असतात. प्राईसला हा त्यातलाच प्रकार वाटतो आहे. त्याने सर्व नागरिकांनी मुद्दाम येऊन हा प्रकार पाहावा आणि त्यामागचे कारण उलगडावे अशी विनंती केली आहे.

Leave a Comment