शेकाप नेते दि.बा. पाटील कालवश

रायगड, दि.24 – शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार दिनकर बाळू (दि. बा.) पाटील यांचे आज पहाटे त्यांच्या पनवेल येथील संग्राम या राहत्या घरीच वृद्धापकाळाने निधन झाले.
ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्यावर आज दुपारी दोन वाजत पनवेल येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्य संस्कार करण्यात आले.
पाटील त्यांच्या मृत्यूमुळे शेकाप कार्यकर्त्यांमध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. 13 जानेवारी, 1924 साली रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील जासई गावात दि.बा.पाटील यांचा जन्म झाला. दि. बा. पाटील यांनी 1957 ते 1972 आणि पुन्हा 1980 साली अस सलग दोन वेळा पनवेल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले होते. तसेच 1977 आणि 1984मध्ये लोकसभेत कुलाबा मतदार संघाचे प्रतिनिधीत्वही त्यांनी केले. विधानसभेचे विरोधी नेतेपद भूषविलेल्या दि.बा.पाटील यांनी 1999 ची लोकसभा निवडणूक शिवसेनेच्यावतीनं लढविली पण या निवडणुकीत रामशेठ ठाकूर यांच्या विरोधात ते पराभूत झाले होते.

शेतकर्‍यांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढणार्‍या दि.बा.पाटील यांनी 1984 मध्ये नवी मुंबईसाठी सुरू असलेल्या भूसंपादनाच्या विरोधात लढा उभारला होता. त्यांच्या निधनाने रायगडातील शेतकरी आणि कामगारांच्या हक्कासाठी लढणारे प्रामाणिक नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

कष्टकर्‍यांसाठी लढणारा लोकनेता हरपला – मुख्यमंत्री

शेकापचे ज्येष्ठ नेते दि. बा. पाटील यांच्या निधनाने कष्टकर्‍यांसाठी आयुष्य झिजविणार्‍या लोकनेत्याची अखेर झाली आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात की, दिबांनी आपले संपूर्ण आयुष्य कष्टकर्‍यांसाठी वेचले. खासदार आणि आमदार म्हणून प्रतिनिधीत्व करताना त्यांनी रायगड जिल्ह्यातील प्रश्‍न
अतिशय धडाडीने मांडले. विरोधी पक्षनेता म्हणून देखील त्यांनी आपल्या वक्तृत्वाने विधानसभा गाजविली. शेतकरी आणि कष्टकर्‍यांवर झालेला कुठलाही अन्याय त्यांनी कधीच सहन केला नाही आणि म्हणूनच त्यांना लोकनेते म्हणून जनतेने गौरविले. साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचा अंगिकार करणार्‍या या नेत्याने रायगड आणि ठाणे जिल्ह्यातल्या प्रकल्पग्रस्तांसाठी दिलेल्या
लढ्याची निश्चितच नोंद होईल. त्यांच्या निधनाने जनसामान्यांसाठी लढणारा संवेदनशील नेता आपण गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला.

Leave a Comment