महाराष्ट्रातील दोन हजार भाविकांना वाचविले

नवी दिल्ली: उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील दोन हजार भाविकांना वाचवण्यात यश आल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण दिली. मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतील महाराष्ट्र भवनात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. जे मराठी भाविक दिल्लीत परतलेत, त्यांना महाराष्ट्रात पोहोचवण्यासाठी प्रत्येकी २ हजार रुपये खर्चासाठी देण्यात येत आहेत. तसंच गरजेनुसार बस आणि रेल्वेचे तिकीट उपलब्ध करून दिले जात असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

महाराष्ट्रातील भाविकांसाठी महाराष्ट्रात जाणा-या रेल्वेमध्ये जागा उपलब्ध व्हावी, यासाठी मुख्यमंत्र्यांनी रेल्वेमंत्र्यांशी संपर्क साधून, अतिरिक्त बोगीची मागणी केली आहे. तसेच या भाविकांना रिझर्व्हेशनमध्ये कोणताही अडचणी येऊ नयेत, यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक प्रवाशाशी संपर्क साधण्याचे काम मुंबई कंट्रोल रुममधून केलं जात आहे.

राज्यातील ३० अधिकारी आणि २ हेलिकॉप्टर्स उत्तराखंडमध्ये कार्यरत आहेत. या पथकाकडून सरकार आणि भाविकांशी संपर्क साधून समन्वय साधला जात आहे. उत्तराखंड, देहराडून, बद्रीनाथ, ऋषीकेश आदी ठिकाणी हे अधिकारी कार्यरत आहेत.महाराष्ट्रातील भाविकांच्या बचावासाठी राज्य सरकार हे गृहमंत्रालय, स्थानिक प्रशासनासोबत समन्वय साधत असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. भाविकांच्या बचावासाठी महाराष्ट्र सरकारची २ हेलिकॉप्टर्स उत्तराखंडमध्ये दाखल झाली आहेत. विविध ठिकाणी अडकलेल्या मराठी भाविकांना वाचवण्यास प्राधान्य राहील.

Leave a Comment