मुंबई दि. २४ – नॉर्टन तर्फे नुकत्याच इंटरनेट सिक्युरिटी थ्रेट या विषयावर प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार भारतात दरवर्षी ४ कोटी २० लाखांहून अधिक सायबर गुन्हे घडत असून त्यापोटी देशातील नागरिकांना ८ अब्ज डॉलर्सचे नुकसान सोसावे लागते आहे. जगात सायबर गुन्हांमुळे होणारे आर्थिक नुकसान ११० अब्ज असून भारताचा त्यातील वाटा सात टक्के इतका आहे. सर्वाधिक गुन्हे बिझीनेस, टेक्नॉलॉजी आणि शॉपिग वेबसाईटवर घडत असल्याचेही या अहवालात नमूद केले गेले आहे.
गेल्या वर्षात अशा गुन्ह्यांना बळी पडलेल्यांचे प्रमाण ५२ टक्के इतके असून त्यात प्रामुख्याने मालवेअर, व्हायरस, हॅकींग, स्कॅम, फ्रॉड अशा गुन्ह्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या अहवालानुसार भारतात प्रत्येक मिनिटाला ८० युजर सायबर क्राईमची शिकार बनत आहेत. १० पैकी ७ प्रौड आयुष्यात एकदा तरी अशा प्रकारच्या गुन्ह्यांनी पोळले गेले आहेत असे नॉर्टनचे कंट्री सेल्स मॅनेजर रितेश चोप्रा यांचे म्हणणे आहे.
सायबर क्राईममध्ये फ्रॉड करून होत असलेल्या नुकसानीचे प्रमाण ८५ टक्के इतके आहे. अशा प्रकारच्या गुन्हयात ४२ टक्के वाढ झाली आहे तर मोबाईल मालवेअरच्या प्रमाणातील वाढ ५८ टक्के इतकी आहे. ईमेल आयडी चोरणे, टेलिफोन नंबर चोरणे यात ३२ टक्के वाढ दिसून येत आहे तर वेबसाईटच्या माध्यमातून फसवणूक करण्याचे प्रमाण ६१ टक्कयांनी वाढलेले आहे. या गुन्हयात १६ टोळ्या कार्यरत असल्याचेही समजते.
जगात घडत असलेल्या सायबर गुन्ह्यात स्पॅम प्रकारच्या गुन्ह्यात भारत जगात आघाडीवर आहे. व्हायरस अॅटॅक बाबतीत भारताचा नंबर दुसरा आहे तर धमक्या मिळण्यासारख्या गुन्ह्यात भारताचा जगात तिसरा क्रमांक आहे असेही या अहवालात नोंदविले गेले आहे.