आजपासून विम्बल्डन स्पर्धेला सुरुवात

लंडन- सोमवारपासून प्रतिष्ठित ग्रॅँडस्लॅम अशी ओळख असणा-या विम्बल्डन टेनिस स्पर्धेला सुरूवात होत आहे. फ्रेंच ओपनमधील लाल माती आणि ग्रास कोर्टवरील (हिरवळ) सामने यात मोठा फरक आहे. ते पाहता फ्रेंच ओपनप्रमाणे (नाडाल) येथे जेतेपदाचा दावेदार ठरवणे कठीण आहे. मात्र स्वित्झर्लंडलडचा रॉजर फेडरर आणि अमेरिकेची सेरेना विल्यम्स या तिशी ओलांडलेल्या टेनिसपटूंकडून यंदा जेतेपद राखण्याची अपेक्षा करण्यात येत आहे.फेडरर आणि नाडाल पुरुषांमध्ये फेडररसमोर स्पेनचा राफाएल नाडालचे मुख्य आव्हान असेल.

फेडरर यंदा विक्रमी आठव्यांदा विम्बल्डन जिंकण्यासाठी उत्सुक आहे. याउलट नाडालला दोन वेळा (२००८ आणि २०१०) ही स्पर्धा जिंकता आली असली तरी ग्रासकोर्टवर आपणही यशस्वी होऊ शकतो, हे दाखवून देण्याचा त्याचा प्रयत्न असेल. ब्रिटनचा अ‍ॅँडी मरे उपांत्य फेरी गाठल्यास फेडरर किंवा नाडाल यांचे आव्हान स्वीकारण्यास तयार असेल. त्यातच ब्रिटनच्या टेनिसपटूला १९३६ नंतर विम्बल्डन विजेता पाहायला मिळाला नाही. मरेला गेल्यावर्षी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागल्याने ब्रिटनवासियांची प्रतीक्षा आणखी लांबली. त्यातच मरे नुकताच पाठदुखीमुळे फ्रेंच ओपनला मुकला होता. अव्वल मानांकित सर्बियाचा नोवाक जोकोविचला सध्या तरी अंतिम फेरी गाठण्यासाठी मोठा अडथळा दिसत नाही.

फ्रेंच ओपनमध्ये सेरेनाने ज्याप्रकारे पहिल्या सामन्यापासून वर्चस्व राखले ते पाहता यंदा तिला टक्कर देणे कठीण असल्याचे म्हटले जात असले तरी रशियाची मारिया शारापोवा आणि बेलारुसची व्हिक्टोरिया अझारेंका या दोघी क्षणार्धात खेळ उंचावू शकतात. त्यातच ‘हाफ’मध्ये अझारेंका-शारापोवा उपांत्य फेरीत आमनेसामने येऊ शकतात. सेरेना अंतिम फेरीपूर्वी बाद झाल्यास महिला जेतेपदाची दावेदार ठरवणे कठीण आहे.

Leave a Comment