स्नोडेनची मैत्रीण त्याच्याबरोबर न जाण्याची शक्यता

पेनासिल्व्हीया दि. २४- अमेरिकेच्या राष्ट्रीय संरक्षण संस्थेची गुप्त कागदपत्रे वर्तमानपत्रांना देऊन राष्ट्रीय गुपिते उघड केल्याचा आरोप असलेला या संस्थेचा माजी कॉन्टॅक्टर एडवर्ड स्नोनेड याची मैत्रीण लिंडसे मिल्स त्याच्याबरोबर अज्ञातवासात न जाण्याचीच जास्त शक्यता असल्याचे लिंडसेचे वडील जोनाथन यांनी म्हटले आहे. लिंडसे तिच्या मित्रमंडळींबरोबरच राहाते आहे.

स्नोडेनने गुप्त माहिती उघड केल्यानंतर हाँगकाँगला पलायन केले होते. तेथून तो आता अमेरिकेला हस्तांतरण टळावे म्हणून मास्कोत गेला असून त्याने इक्वेडोरकडे राजकीय आश्रय मागितला आहे. इक्वेडोर सरकार त्याच्या विनंतीवर विचार करत आहे. लिंडसे स्नोडेन सोबत हवाई येथे राहात होती आणि आजही ती तिथेच आहे असे सांगून तिचे वडील म्हणाले की स्नोडेनला किती काळ अज्ञातवासात घालवावा लागेल याची कल्पना नाही आणि लिंडसेचीही त्याच्याबरोबर फरपट व्हावी असे त्याला वाटत नाही. त्यामुळे लिंडसे कदाचित त्याच्याबरोबर जाणार नाही.

स्नोडेनला आम्ही बालपणापासून ओळखतो असे सांगून जोनाथन मिल्स म्हणाले की तो खोट्या गोष्टींबाबत अगदी प्रथमपासूनच अत्यंत जागरूक आहे आणि खोटे तो सहन करू शकत नाही. त्याने वृत्तपत्रांकडे कागदपत्रे दिली याचा अर्थ गैर कांही तरी घडते आहे याची त्याला खात्रीच पटली असणार. त्याला शिक्षा होईल का हे मी सांगू शकणार नाही मात्र त्याने जे केले ते सर्व जनतेच्या चांगल्यासाठीच केले आहे.

अमेरिकेने १४ जूनलाच स्नोडेन विरोधात गुन्हा दाखल केला असून सरकारी कागदपत्रांची चोरी, लष्कराची गुपिते फोडणे, सरकारी मालमत्तेची चोरी असे गुन्हे त्याच्यावर दाखल केले गेले आहेत.

Leave a Comment