नॉर्वेतील किर्केनिस बंदर येतेय आशिया खंडाजवळ

नॉर्वे दि.२४ – कधीकाळी अन्य युरोपिय बंदरांच्या तुलनेत आशिया खंडापासून खूपच दूर असलेले नॉर्वेच्या अति उत्तरेकडील किर्केनिस बंदर आता अचानक आशिया खंडाला जवळ येऊ लागले आहे. या भागातील बर्फ वितळण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याने जलवायू बदलांमुळे हे नवल घडले आहे. रशियाच्या आर्टिक्ट तटरेषेला लागून असलेला नॉर्दन सी रूट या पाण्याच्या प्रवाहामुळे मोकळा झाला आहे. परिणामी आता आंतरराष्ट्रीय व्यापारातही वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कायम बर्फाच्या आवरणाखाली असलेला हा मार्ग आता मोकळा झाल्यामुळे जपानच्या योकोहामा बंदरापासून जर्मनीच्या हॅम्बर्ग बंदरापर्यंत प्रवासासाठी लागणारा वेळ ४० टक्के कमी झाला आहे तर यामुळे जहाजांच्या इंधन बचतीतही २० टक्के वाढ झाली आहे. नॉर्वेचे शिपओनर संघटनेचे अध्यक्ष हेन्रीक्सन म्हणाले की आमच्या समुद्र व्यापाराच्या इतिहास नॉर्वेच्या अतिउत्तरेकडील हा समुद्रमार्ग प्रथमच खुला झाला आहे. याचा फायदा व्यवसाय वाढीसाठी नक्कीच होणार आहे. २०१० सालात या मार्गाने केवळ चार जहाजे आली होती कारण तेव्हा येथील बर्फ ३४ लाख स्क्वेअर किलोमीटर स्तरावर होता. आता मात्र २०१२ मध्ये हा मार्ग मोकळा होत असल्याने ४६ जहाजे या मार्गाने येऊ शकली आहेत.

अर्थात जगभरात होत असलेल्या समुद्री वाहतुकीत या मार्गाने होणारी वाहतूक अद्याप नगण्यच मानावी लागेल मात्र भविष्यात ही वाहतूक नक्कीच लक्षणीय असेल असे सांगितले जात आहे. सध्या पनामा कालव्यातून वर्षाला किमान १५ हजार जहाजे जातात.