टीम इंडियाच ठरली चॅम्पियन्स

बर्मिंगहॅम- आयसीसी चँपियन्स ट्रॉफीसाठी रंगलेल्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडवर पाच धावांनी विजय मिळवला. भारताच्या 129 धावांचा पाठलाग करणा-या इंग्लंडच्या फलंदाजांना भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर 124 धावाच करता आल्या.

सुरुवातीलाच भारताच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. सलामीला आलेला इंग्लंडचा कर्णधार अवघ्या दोन धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंडचे अन्य फलंदाजही फक्त हजेरी लावून तंबूत परतले. इयन बेल 13 धावांवर बाद झाला. तर जोनाथन ट्रॉटने 20 धावा केल्या. ज्यो रूट अवघ्या सात धावा करुन तंबूत परतला. 10 षटके झाली तेव्हा इंग्लंडने चार बाद 46 धावा केल्या होत्या. त्यानंतर मात्र इयॉन मॉर्गन आणि रवी बोपाराने इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र इशांत शर्माच्या गोलंदाजीवर अश्विनकडे झेल देत मॉर्गन 33 धावांवर बाद झाला. पाठोपाठ इशांत शर्माच्या गोलंदाजीवर अश्विनकडे झेल देत बोपाराही 30 धावांवर बाद झाला.

भारताकडून इशांत शर्मा, रविंद्र जाडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी दोन आणि उमेश यादवने एक गडी बाद केला.

तत्पूर्वी, भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 129 धावा केल्या. भारतातर्फे सर्वाधिक योगदान विराट कोहलीने (34 चेंडूंत 43 धावा) दिले. त्याला शिखर धवन (31) रवींद्र जडेजाची (नाबाद 33) चांगली साथ लाभली. चेंडू बॅटवर येत नव्हता. त्यातच फटकेबाजीच्या नादात भारताच्या फलंदाजांनी विकेट फेकल्या. सलामीवीर धवनने एक बाजू लावून धरली तरी रोहित शर्मा (9), दिनेश कार्तिक (6), सुरेश रैना (1) आणि कर्णधार महेंद्रसिंग ढोणी (0) झटपट परतल्याने 13व्या षटकात 6 बाद 66 अशी भारताची बिकट अवस्था झाली. मात्र कोहली आणि जडेजाने सातव्या विकेटसाठी 33 चेंडूंत 47 धावांची भागीदारी करताना भारताचे शतक फलकावर लावले.

Leave a Comment