गुन्हेगारांची हवाई टेहळणी

देशातली गुन्हेगारी कमी व्हावी म्हणून करावयाचा एक उपाय म्हणून केन्द्र सरकारने सात मोठ्या शहरांतल्या गुन्हेगारांची हवाई टेहळणी करण्याची योजना आखली आहे. या योजनेनुसार या शहरांत हेलिकॉप्टर सतत घिरट्या घालत असतील. या हेलिकॉप्टरांत टेहळणीची अत्यधुनिक यंत्रणा बसवलेली असेल. या यंत्रणांत उच्च क्षमतेचे कॅमेरे आणि सेन्सार्स बसवलेले असतील. अशी माहिती केन्द्रीय गृहखात्याने दिली आहे. या योजनेत दिल्ली, मुंबई, कोलकत्ता, बंगलोर, चेन्नई, अहमदाबाद आणि हैदराबाद या शहरांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पाला सेफ सिटी प्रॉजेक्ट असे नाव देण्यात आले आहे.

या यंत्रणेकडून जमा होणारी माहिती कमांड कंट्रोल सेंटरला पाठवली जाईल. मुळात अशी काही यंत्रणा आपल्यावर अवकाशातून नजर ठेवून आहे हे लक्षात आले तर गुन्हेगारांवर नियंत्रण येईल असे गृहखात्याने म्हटले आहे. या यंत्रणेतले क्लोज सर्किट टीव्ही परिणामकारक असतील. सार्वजनिक ठिकाणे आणि सरकारी कार्यालये या यंत्रणेच्या निगराणीखाली असतील. मोठे रस्ते, स्थानके, विमानतळ, चौक, बगिचे, पर्यटन स्थळे यावर या यंत्रणेचे लक्ष असेल. विशेष करून ज्या भागात लोकसंख्या दाट आहे त्या भागांवर या यंत्रणेची नजर रोखलेली असेल.

या यंत्रणेत सहभागी होण्याबाबत खाजगी क्षेत्रालाही प्रोत्साहन दिले जाणार आहे. पोलीस दलाच्या आधुनिकी करणाची योेजना सरकारने २००५ साली आखली होती. या योजनेचा एक भाग म्हणून ही निगराणी यंत्रणा वाढवली जाणार आहे. आधुनिक जीवनपद्धती आणि शहरीकरण यांचा विचार करून ही योजना आखली जात आहे. कायदा सुव्यवस्था स्थिती सुधारावी यासाठी सतत नवी पोलीस भरती करणे हाच काही एकमेव उपाय नसतो. पोलिसांना आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरवठा करूनही त्यांची कार्यक्षमता वाढवता येत असते असे या योजने मागचे सूत्र आहे.

Leave a Comment