उल्हासनगरमधील धोकादायक इमारती जमीनदोस्त

उल्हासनगर – ठाणे आणि मुंब्रा येथील तीनमजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर उल्हासनगर महापालिकेने शहरातील अतिधोकादायक इमारती जमीनदोस्त करण्याचा धडाका लावला आहे. दहा वर्षापासून धोकादायक इमारतींच्या यादीत असलेल्या चार मजली ‘सदारंगानी’ व बाजारपेठ परिसरातील असलेली ‘गुरुकृपा’ या इमारतीचे बांधकाम पाडण्यात आले.

उल्हासनगरातील १५१ इमारतींपैकी २७ इमारती अतिधोकायक आहेत. या इमारतींना पालिकेने दोनदा नोटिस बजावून सदनिकाधारकांना घरे खाली करण्याच्या सूचना केल्या होत्या. शनिवारी सकाळी प्रभाग समिती दोनमधील शिवाजी चौक परिसरातील गुरुकृपा मार्केट ही दुमजली व्यवसायिक इमारत व जवाहर हॉटेल जवळील सदारंगानी या चार मजली रहिवासी इमारतीवर कारवाईचा हातोडा चालवण्यात आला.

केवळ तीन सदनिकांत कुटुंबे राहत होती. मात्र, पालिकेच्या नोटिशीमुळे मुळच्या जागामालक कांता पहिलाज नेलानी यांनी सदनिकाधारकांकडून कवडीमोल किमतीत सदनिका विकत घेतल्या आहेत. उर्वरित सदनिकाधारकांना सदनिका विक्रीसाठी दबाव येत असल्याचा आरोप येथील रहिवासी सोनिया फुलवांनी यानी केला आहे. गुरुकृपा इमारतीत नऊ व्यावसायिक गाळे व्यापारी गोदाम म्हणून वापरत होते. माधुरी पॅलेस इमारतीत १६ सदनिका आहेत. वर्षभरापूर्वी चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळून तिस-या मजल्यावर आल्याने रहिवासी धोकादायक स्थितीत राहत आहेत.

Leave a Comment