स्वीस बँकांतील काळा पैसा, पाकची भारतावर आघाडी

झुरीच दि.२२ – भारतीय राजकारणी, उद्योजक आणि काळा पैसा असणारे बडे मासे स्वीस बँकातून हा पैसा लपवत असले तरी यात पाकिस्तान्यांनी भारतीयांना मागे टाकले आहे. स्वीस नॅशनल बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार पाकिस्तानी नागरिक आणि संस्थांनी या बँकात ठेवलेली रक्कम १४४.१ अब्ज स्वीस फ्रँक म्हणजे पाकिस्तानी रूपयांत १५ हजार कोटी तर भारतीय रूपयांत ९२०० कोटी इतकी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भारताप्रमाणेच पाक नागरिकही तेथील राजकारणी काळा पैसा स्वीस बँकेत दडवत असल्याचा आरोप सातत्याने करत असतात. आता स्वीस बँकने आकडेवारीच जाहीर केली आहे. त्यानुसार भारतापेक्षा पाकिस्तानची स्वीस बँकेतील रक्कम दीड टक्क्याने अधिकच असल्याचे दिसून आले आहे.

स्वीस केंद्रीय बँक २००२ सालापासून अशी आकडेवारी गोळा करत आहे.२००५ साली पाकिस्तान्यांनी सुमारे ३ अब्ज स्वीस फ्रँक्स या बँकातून ठेवले होते मात्र २०१० पर्यंत ही संख्या रोडावून १.९५ अब्ज स्वीस फ्रँक्सवर आली होती.३१ डिसेंबर २०१२ पर्यंत पाकिस्तानचा हा पैसा १.४४ अब्ज म्हणजेच ९२०० कोटी भारतीय रूपयांवर आला आहे. भारताचा स्वीस बॅकेतील पैसा ९१०० कोटी रूपयांवर आहे असेही या आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे.