पुराभिलेखविद्यातज्ञ डॉ. शोभना गोखले यांचे निधन

पुणे, दि. 22 (प्रतिनिधी) – ज्येष्ठ इतिहास संशोधक, भारतातील पहिल्या महिला पुराभिलेखविद्याआणि नाणकशास्त्रज्ज्ञ डॉ. शोभना गोखले यांचे शनिवारी सकाळी साडे सात वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 85 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्‍चात एक मुलगा, एक मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. पुणेविद्यापीठाचे पत्रकार अभ्यासक्रम विभागप्रमुख डॉ ल ना गोखले यांच्या त्या पत्नी होत.

डॉ. शोभना लक्ष्मण गोखले यांचा जन्म फेब्रुवारी 1928 मध्ये झाला होता. अमरावतीत संस्कृतीमध्ये बीए झालेल्या गोखले यांनी विवाहानंतरही शिक्षण घेतले. डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व विभागातून प्रपाठक म्हणून त्या निवृत्त झाल्या होत्या. अनेक शिलालेख आणि ताम‘पटांचे त्यांनी वाचन केले होते. तसेच प्राचीन नाण्यांचाही त्यांचा गाढा अभ्यास होता. याविषयांवर त्यांची 9 पुस्तके प्रकाशित आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे 150 पेक्षा जास्त शोधनिंबध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधून प्रकाशित झाले आहेत. पुराभिलेख विद्या हे 1975 साली आलेले त्यांचे पुस्तक विशेष गाजले.

ब्रम्हीलिपीच्या तज्ज्ञ म्हणूनही त्यांची वेगळी ओळख होती. महाराष्ट्रीय नाण्यांबाबतही त्यांनी महत्त्वाचे संशोधन केले आहे. अनेक संशोधन निबंध लिहिणार्‍या डॉ. गोखले यांनी लोकांना या शास्त्रांची गोडी लागावी, यासाठी स्फुट लेखनाद्वारे आपले संशोधन मांडले. रांजणगावची नाणी, जुन्नरची नाणी, कान्हेरीचे संशोधन आणि विसापूर, नाणेघाट, जुन्नर, नाशिक येथील अनेक शिलालेखांचे अर्थ लावल्यामुळे पुरातत्व क्षेत्रात डॉ. गोखले यांच्या कार्याला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली होती. नुकताच त्यांनी जुन्नर येथील शिलालेखांचा प्रकल्प पूर्ण करुन अहवाल पूर्ण केला होता. त्यांना अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.

डेक्कन कॉलेजात अभ्यास करताना ज्येष्ठ पुरातत्व संशोधक डॉ. सांकलिया, डॉ. कात्रे आणि मानववंशशास्त्रज्ज्ञ आणि विचारवंत डॉ.इरावती कर्वे यांच्याशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. एम.एम, पीच.डी झाल्यानंतर त्यांनी इतिहास व प्राचीन भारतीय संस्कृती या विषयावर विविध ठिकाणी अध्यापनही केलेले आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, डेक्कन कॉलेज, भारत इतिहास संशोधन मंडळ, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थांमध्ये त्यांनी मार्गदर्शन केले होते.

Leave a Comment