अखेर एसटी कामगारांचा वेतन करार ‘फायनल’- दोन हजार कोटींचा बोजा

पुणे, दि. 22 (प्रतिनिधी) – गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला एसटी कामगारांचा 13 टक्कयांचा वेतन करार अखेर फायनल झाला. त्यामुळे एसटीच्या कर्मचार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असले तरी ज्या दोन अटींवर एसटी महामंडळ प्रशासन आणि मान्यता प्राप्त संघटना यांच्यात एकमत होत नव्हते, त्या दोन अटींवर संघटनेला मान्यता द्यावीच लागली. त्यानुसार यापुढे प्रत्येक वेतन करार हा उत्पादन वाढीशी निगडितच केला जाणार आहे. या करारामुळे महामंडळावर सुमारे 2004 कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडणार आहे. ही वेतनवाढ ऑगस्टच्या पगारात कामगारांना मिळणार आहे.

एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांचा एप्रिल 2012 ते मार्च 2016 या चार वर्षांचा वेतन करार गेले अनेक महिने रखडला होता. या वेतन करारामध्ये एसटीमधील महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने एकूण 311 मागण्या आणि 22.5 टक्के वेतनवाढीची मागणी केली होती. मात्र महामंडळाची आर्थिक स्थिती पाहता राज्य सरकारने 13 टक्के वेतनवाढ देण्याचे अंतिम मान्य केले होते. त्यानुसार 16 पर्यंतच्या चार वर्षांच्या वेतन करारापोटी महामंडळाला 2004 कोटीचा आर्थिक बोजा सहन करावा लागणार आहे. या करारामध्ये महामंडळाच्या गाड्यांची बांधणी करणार्‍या तीन मध्यवर्ती कार्यशाळांमध्ये मनुष्यबळ 300 तासांवरून कमी करून 200 तासांवर करण्याचे मान्य करण्यात आले आहे. त्यामुळे महामंडळाची वर्षाला 8 लाख 50 हजार रुपये म्हणजेच चार वर्षांसाठी 34 लाख रुपयांची बचत होणार आहे.
या पैशांचा वापर महामंडळातर्फे मध्यवर्ती कार्यशाळांमध्ये पायाभूत सुविधा देण्यासाठी करण्यात येणार आहे. त्याशिवाय कर्मचार्‍यांचा सायनिंग ऑफ आणि ऑन यापुढे 15 मिनिटांचा करण्यात येणार असल्यामुळे महामंडळाचे वर्षाला 12 क ोटी तर 4 वर्षांसाठी 48 कोटी रुपये ओव्हरटाईमचे वाचणार आहेत.

यापुढे महामंडळाचा प्रत्येक वेतन करार हा उत्पादन वाढीशी निगडित असणार असून महामंडळाचे उत्पादन कसे वाढेल, यावर आधारित मागण्या संघटनांनी कराव्यात, असा संदेश या वेतन करारातून महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिपक कपूर यांनी एक प्रकारे दिला आहे. या करारावेळी महामंडळातर्फे महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिपक कपूर, महाव्यवस्थापक (क.व.औ.सं.) रा. रा. पाटील, तसेच महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण आणि जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी वेतन करारावर स्वाक्षरी केली. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे उपस्थित होते.

Leave a Comment