डेहराडून दि.२२ – गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी शुक्रवारी सायंकाळी उत्तराखंडची राजधानी डेहराडून येथे पोहोचले असून आज सकाळी ते हेलिकॉप्टरमधून प्रलंयकारी पावसाच्या तडाख्याने झालेल्या नुकसानीची हवाई पाहणी करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आज ते प्रथम उत्तराखंडचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांना भेटणार आहेत आणि लागेल ती मदत देण्याची तयारी असल्याचे सांगणार आहेत. मात्र ही बातमी देईपर्यंत पुन्हा तेथील हवामान बिघडल्याने उत्तराखंड सरकारने मोदी यांच्या हेलिकॉप्टरला उड्डाणाची परवानगी दिली नसल्याचे ताजे वृत्त आहे.
काल सायंकाळी डेहराडून मध्ये पोहचल्यानंतर बोलताना मोदी यांनी या पहाडी राज्यावर कोसळलेले संकट हे सर्व देशावरचे संकट असल्याचे सांगून सर्व देश उत्तराखंडाचा मदतीसाठी सज्ज असल्याचे सांगितले. गुजराथ राज्याकडूनही उत्तराखंड राज्याला हवी असेल ती सर्व मदत देण्याची तयारी मोदी यांनी दर्शविली आहेच पण त्याचबरोबर या आपत्तीत सापडलेल्या गुजराथी बांधवांना घरी परत सुरक्षित पोहोचविले जाईल याची खात्री देण्यासाठीही मोदी येथे आले आहेत. अहमदाबाद हून दोन बोईंग चार्टर विमाने येथे अडकलेल्या गुजराथी यात्रेकरू पर्यटकांसाठी तैनात करण्यात आली असल्याचेही समजते.