नासाच्या भावी अंतराळवीरांत निम्मी संख्या महिलांची

वॉशिंग्टन दि.२२ – गेल्या चार वर्षात प्रथमच नासाने भावी अंतराळवीर यात्रींच्या पथकाची निवड केली असून निवडल्या गेलेल्या आठ अंतराळवीरांत चार महिलांना स्थान देण्यात आले आहे. या निवडीसाठी ६१०० अर्ज आले होते व त्यातून आठ जणांना निवडले गेले आहे.

नासामधील प्रशासकीय अधिकारी चार्ल बोल्डेन या विषयी सांगताना म्हणाले की या सर्वांना जगभरातील अंतराळ केंद्रात तसेच एक लघु ग्रह आणि मंगळ ग्रहावरील प्रवासासाठी प्रशिक्षित करण्यात येणार आहे. गेली तीन दशके अंतराळ यात्री अंतराळात नेणे व आणणे यासाठी अंतराळ यानाचा उपयोग केल्यानंतर तो कांही काळ बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे अंतराळवीरांसाठीचे प्रशिक्षणही थांबविले गेले होते.

निवड झालेल्या अंतराळयात्रींना आम्ही येथे मोठे साहसपूर्ण काम करतो आहोत याची जाणीव आहे असे सांगून बोल्डेन म्हणाले की आता पहिल्यापेक्षाही अधिक अंतराच्या  अंतराळ प्रवासाची तयारी आम्ही सुरू केली आहे. निवड झालेले अंतराळवीस लघु ग्रह आणि मंगळावर पहिला मानव उतरविण्याच्या मिशनमध्ये आम्हाला मदत करणार असून हे सर्वजण ३४ ते ३९ वयोगटातील आहेत. या सर्वांना ऑगस्टपासून हॉस्टन येथील जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे.