नवी दिल्ली, दि.21 – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांच्यावर केले जाणारे संधीसाधूपणाचे आणि विश्वासघाताचे आरोप फेटाळून लावले आहेत. जनता दल युनायटेडने कोणाचाही विश्वासघात केलेला नाही तसेच मी संधीसाधूही नाही. उलट भाजपनेच दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे आम्हाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधुन बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा लागला असे नितीश कुमार यांनी एका खासगी इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
ज्या नेत्यामुळे आघाडीच्या विस्ताराला बाधा येईल अशी नेत्याला आघाडीचा नेता म्हणून पुढे आणू नका तसेच वादग्रस्त मुद्दे बाजूला ठेवा असे आम्ही भाजपला आधीच स्पष्ट केले होते. मात्र भाजपने आमचे ऐकले नाही त्यामुळे आम्हाला रालोआमधून बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा लागला असे नितीश कुमार यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन करताना सांगितले. राम जन्मभूमी सारखे वादग्रस्त मुद्दे उपस्थित होणार नाहीत याची हमी मिळाल्यानंतरच आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी झालो होते असे नितीश कुमार यांनी सांगितले.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची भाजपच्या निवडणूक प्रचार समितीच्या प्रमुखपदी झालेली निवड जनता दल युनायटेडला मान्य नव्हती. मोदींमुळे धर्मनिरपेक्षतेला धोका असल्याचा मुद्दा उपस्थित करत, जदयूने गेल्या आठवडयात भाजपबरोबरची सतरा वर्षांपासूनची युती तोडली होती.