मानवी करणीचा परिणाम

निसर्गाने आपल्याला खूप काही दिले आहे. मात्र या देणगीबाबत महात्मा गांधींनी असे म्हटले होते की, परमेश्‍वराने आपल्याला आपल्या गरजे (नीड) पुरते दिलेले आहे. पण हव्यासा (ग्रीड) पुरते दिलेले नाही. आपला हव्यास सतत वाढत असतो आणि हव्यासाला सगळ्याच गोष्टी अपुर्‍या पडत असतात. हा हव्यास पूर्ण करण्यासाठी आपण निसर्गाला ओरबडायला लागतो आणि त्याचे परिणाम विनाशकारी होतात. उत्तराखंडात सध्या पावसाने मांडलेला आकांत हा साधारणत: निसर्गाचा प्रकोप मानला जातो आणि अलीकडच्या काळामध्ये अशा संकटांकडे निसर्गाचा प्रकोप म्हणूनच पाहण्याची पद्धत आहे. मात्र प्रत्यक्षात ही संकटे मानवनिर्मित आहे आणि माणसाच्या हव्यासातून निर्माण झालेली आहेत. सध्या वृत्तपत्रांमधून आणि माध्यमांतून उत्तराखंडाची खूप चर्चा होत आहे. परंतु उत्तराखंडाप्रमाणे हिमाचल प्रदेशात सुद्धा असेच संकट कोसळलेले आहे आणि तिथेही शेकडो पर्यटक दुर्गम ठिकाणी अडकून पडले आहेत. आतापर्यंत हिमाचल प्रदेशात मनुष्यहानी झाल्याचे वृत्त नाही. उत्तराखंडात मात्र ७०० लोक मरण पावल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

तिथे भेट दिलेल्या काही नेत्यांच्या मते मृतांचा आकडा मोठा आहे आणि तो ६ हजार पेक्षा अधिक आहे. त्याला अजून दुजोरा मिळाला नाही. परंतु ७ हजार पर्यटक अडकून पडले आहेत या गोष्टीला मात्र दुजोरा मिळालेला आहे. उत्तराखंडात विविध ठिकाणी बांधण्यात आलेल्या ९० धर्मशाळा पुराच्या पाण्यात वाहून गेल्या असून तीन-तीन चार-चार मजली हॉटेले पाण्यामुळे पडली आहेत. हा सारा निसर्गाचा प्रकोप असल्याचे मानले जाते. परंतु प्रत्यक्षात ही सारी संकटे माणसाने आपल्या हाताने ओढवून घेतलेली आहेत. उत्तराखंडामध्ये हिंदू धर्माच्या पवित्र चार धामांपैकी एक आहे. त्यामुळे तिथे भाविक कम पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. शिवाय या परिसरावर निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्याची बरसात केलेली आहे. त्यामुळे धार्मिक भावना नसणारे भारतीय आणि अनेक परदेशी पर्यटक सुद्धा या परिसराकडे आकृष्ट होत असतात. त्याचे काही परिणाम या भागावर झालेले आहे. आजवर एव्हरेस्ट शिखर हे अनुल्लंघ्य समजले जात होते, परंतु काही तांत्रिक प्रगतीमुळे, गीर्यारोहणाच्या वाढत्या शिक्षणामुळे आणि शिखर सर करण्याच्या वाढत्या जिद्दीमुळे अनेक लोक एव्हरेस्ट शिखरापर्यंत पोचायला लागले आहेत. १९५३ सालपर्यंत या शिखरावर एकही माणूस गेलेला नव्हता. पण आता त्या शिखरावर आणि त्याच्या आसपासच्या भागात गीर्यारोहकांच्या अनेक तुकड्या जात असल्यामुळे तिथे सुद्धा आता या लोकांनी टाकलेला कचरा जमा व्हायला लागला आहे. एवढ्या उंच शिखरावर जाणार्‍यांची संख्या कितीही अतिशयोक्ती केली तरी हजारांच्यापुढे नसेल. पण उत्तराखंडातल्या आजवर निर्मनुष्य असलेल्या अनेक मठा-मंदिरांपर्यंत हजारोच काय पण लाखो भाविक जायला लागले आहेत. या भाविकांच्या आणि पर्यटकांच्या जाण्या-येण्याचे आणि त्यांच्या तिथल्या वास्तव्याचे गंभीर परिणाम या भागाच्या पर्यावरणावर झाले आहेत.

एकदा पर्यटक यायला लागल्यावर तिथे व्यवसाय सुरू व्हायला लागतात. लॉज, धर्मशाळा, धार्मिक साहित्य विकणारी दुकाने आणि हस्तकलेच्या वस्तूंचे स्टॉल्स् तिथे सुरू झाले असून त्याच्यातून करोडो रुपयांची उलाढाल होत आहे आणि त्यामुळे तिथे बांधकामांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. एकदा बांधकामाचे प्रमाण वाढायला लागले की, त्यात गैरप्रकार सुरू होतात. लॉजेस्ची बांधकामे परवानगी न घेता, चिरीमिरी देऊन आणि बांधकामाचे नियम धाब्यावर बसवून केली जातात. तशी या भागात केली गेलेली आहेत. हिमालय पर्वताच्या कडेकपारीवरील खडक हा सह्याद्रीच्या खडकासारखा मजबूत नाही, ठिसूळ आहे. अशा ठिसूळ खडकांवर बांधकामे केलेली आहेत. ही बांधकामे सामान्य नाहीत. काही ठिकाणी ती चार-पाच मजली आहेत आणि त्यांना चांगला पाया नाही. पक्का पाया नसताना पाच मजली इमारत बांधल्यास तिला कोसळायला किती वेळ लागणार? आणि पाण्याचा महाकाय लोंढा आल्यास तर ती कितपत टिकणार? आणि म्हणूनच आपण सर्वांनीच दूरचित्रवाणीवर या इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळताना पाहिल्या आहेत. या भागात लोकांची वर्दळ वाढल्यामुळे नव्या सडका करण्यात आल्या. पूर्वी त्या तशा नव्हत्या. सडका करण्यासाठी झाडे तोडण्यात आली. आपण आपल्या सपाट प्रदेशात सुद्धा रस्ता रुंदीकरण करताना किती मोठमोठी झाडे तोडली जातात हे पाहतोच.

अशा सडका करण्याबरोबरच या पर्वतीय प्रदेशातल्या आजवर मुक्तपणे वाहणार्‍या अनेक नद्या अडवून त्यांच्यावर जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आले आहेत. त्यांच्यासाठी मोठी खुदाई करण्यात आली, स्फोट घडवून खडक ढिले करण्यात आले. त्यांच्यामुळे आवश्यक तेवढा खडक सुटा झालाच पण जो सुटा होणे अपेक्षित नव्हते तोही खडक ढिला झाला. झाडे तोडल्यामुळे तो अधिक ढिला झाला. परिणामी दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले. या सगळ्या प्रकारांनी नद्यांच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळे आले आणि हिमालयाच्या अंगाखांद्यावरून बागडत बागडत खाली येणार्‍या या सार्‍या नद्यांनी मिळेल त्या मार्गांनी वहायला सुरुवात केली. एखाद्या फार मोठ्या नदीचा प्रवाह सहजासहजी बदलत नाही. परंतु उगमापासून जवळच असलेल्या प्रदेशात तो सहज बदलू शकतो. त्यामुळे नद्या वाट्टेल तशा वहात आहेत आणि जमेल तिथे बेकायदा बांधकामे झालेली आहेत. पर्यटकांना निसर्ग सौंदर्याचा आस्वाद लुटता यावा यासाठी सोयी केल्या. परंतु त्या सोयी करताना निसर्ग सौंदर्य ओरबाडण्यात आले. त्याचे सारे परिणाम आता आपण भोगत आहोत. उत्तराखंडाच्या या भागामध्ये कोसळलेले हे संकट अशा रितीने आपण आपल्या हाताने ओढवून घेतलेले आहे.